नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या लेखकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारच्या पुस्तकांतून शिवप्रेमींच्या भावना दुखवल्याचे लोंढे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'
'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे लेखक भगवान गोयल, प्रकाशकांच्या विरोधात काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हा त्यांच्या विचारधारेचा आणि कार्याचा मोठा अपमान असल्याचे लोंढे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... ...हे भाजपमध्ये शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?
काय म्हणाले अतुल लोंढे ?
शिवाजी महाराज हे १८ पगड जातींना सोबत घेऊन चालणारे वैचारिक क्रांती घडवून आणणारे एकमेव थोर पुरुष होते. मोदींच्या काळात महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा घटनांमध्ये भाजप नेते सामील असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. तर पीडित कुटूंबीयांवरच कारवाई होते. असा प्रकार शिवाजी महाराजांच्या काळात घडला असता काय ? असा सवाल अतुल लोंढे यांनी केला आहे.
'हि' सभ्यता नरेंद्र मोदी राजकारणात कधी शिकणार..
1965 च्या युद्धात भारत जिंकला होता. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या सत्कारात आचार्य अत्रे यांनी त्यांच्या कार्याची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली. मात्र, यशवंतरावांनी आपल्या उत्तरात बोलताना 'शिवाजी महाराज हे एकमेव आणि अद्वितीय होते. ते अलौकिक होते. तसे कोणी होऊ शकत नाही. माझी त्यांच्या सोबत तुलना करू नका', असे म्हटले होते. यशवंतराव यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ देत लोंढे यांनी, यशवंतराव चव्हाणांच्या प्रमाणे राजकारणातील ही सभ्यता नरेंद्र मोदी कधी शिकणार, असा सवाल केला आहे.
हेही वाचा... 'माझी लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे, हा तर मराठी मातीचा अपमान'
पुस्तकाचा नेमका वाद काय?
भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (12 जानेवारी) प्रकाशन करण्यात आले. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.