नागपूर- देशातील वाढत्या बेरोजगारीला केंद्र सरकार जबाबदार आहे. अनेक युवकांचे कोविडच्या काळातही रोजगार गेले. त्यामुळे, वाढती बेरोजगारी कमी करा. या मागणीसाठी नागपुरात युवक काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. नागपुरातील मोमीनपुरा भागात हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून युवकांना आश्वासना व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. लॉकडाऊनच्या काळातही अनेक युवकांचे रोजगार गेले. याला जबाबदार केंद्र सरकार आहे. असा आरोपही काँग्रेसतर्फे करण्यात आला.
केंद्र सरकार फक्त युवकांना आशेचा गाजर दाखवत आहे. युवकांना रोजगार न देता फक्त खोटी आश्वासने देत आहे. त्यामुळे, अनेक युवकांवर आज बेरोजगारीची वेळ आली. याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार असल्याचा आरोप काँग्रसतर्फे झाला. तसेच, देशातील युवकांना रोजगार देऊन बेरोजगारीला आळा घाला, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिवाय मोदी फक्त मोठ मोठ्या घोषणाबाजीच करतात. परंतु, ते आजपर्यत युवकांना रोजगार देऊ शकले नाही. त्यामुळे, भाषणापेक्षा युवकांना रोजगार द्या, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. तसेच, पंतप्रधानांनी युवकांचा रोजगाराचा प्रश्न वेळीच सोडवला नाही, तर युवक काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला.
हेही वाचा- होम क्वारंटाइन बाधित रुग्णांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कुटुंबियांचा संताप