नागपूर - नागपूर शहराची लोकवाहिनी अशी ओळख असलेली 'आपली बस' लवकरच नव्या रुपात आणि नवीन तंत्रज्ञानासह नागपूरकारांच्या सेवेत रूजू होणार आहे. नवीन बस या इलेक्ट्रिक ( Nagpur E Bus ) स्वरुपात जनतेच्या सेवेत रुजू होणार आहेत. या नव्या ई-बसचे बाह्यरूप आणि रंगसंगती कशी असावी हे ठरवण्याची संधी जनतेलाच देण्यात आली आहे. या नव्या ई-बसचे रंगरूप डिजाईन करण्यासाठी मनपातर्फे स्पर्धेचे ( Competition for the people ) आयोजन करण्यात आले आहे. नागपूर शहरात महानगरपालिकेतर्फे शहर बस वाहतुकीचे संचालन करण्यात येते. सध्या सेवेत असलेल्या या बस आता खूप जुन्या झाल्या आहेत. यातील काही बस सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत. उर्वरित सर्व बसची जागा इलेक्ट्रिक बस घेणार आहेत.
२०० इलेक्ट्रिक बस मिळणार मनपाला - स्मार्ट सिटी अंतर्गत १५ ई-बस घेण्यात येत आहेत. इलेक्ट्राकडून ४० बस घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी ९ बस आठवडाभरात मिळणार आहेत. १४ व्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत १४४ बस पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. सर्व बस मिळून पहिल्या टप्प्यात यावर्षी २०० हून अधिक इलेक्ट्रिक बस मनपाला मिळणार आहेत.
बाह्यरूप डिजाईन करा, पुरस्कार मिळवा - पर्यावरणाचे रक्षण यासह प्रवाशांना एसी प्रवासाची सुविधा या ई-बसच्या माध्यमातून मिळणार आहे. या ई बसच्या बाह्यरूपाच्या डिजाईनसाठी महापालिकेने स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेद्वारे आलेल्या उत्कृष्ठ कल्पनाचित्राची निवड आपली बसच्या बाह्यरूपासाठी केली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. नागरिकांनी कल्पनाचित्रे मनपा किंवा मनपा आयुक्तांच्या सोशल मीडिया खात्यावर पाठवायची आहेत.
हेही वाचा - अग्निपथ योजना: सैन्याने जाहीर केली संपूर्ण अटी आणि शर्तींसह योजनेची माहिती