नागपूर - मकरसंक्रांतीनिमित्त शहरातील प्रत्येक भागात पतंगबाजी सुरू झालेली आहे. आकाशाचा बराच भाग विविधरंगी आणि विविध आकारांच्या पतंगांनी व्यापला असल्याचे दिसून येत आहे. पतंगबाजी करण्याची हौस भागविण्यासाठी बच्चे कंपनीसह ज्येष्ठ नागरिकदेखील आज टेरेसवर दिसून येत आहेत. एकमेकांची पतंग कापल्याचा आनंद व्यक्त करताना नागपूरकर 'ओ...काट'ची धूम करताना दिसून आले.
सुखद चित्र
मकरसंक्रांतीचा उत्सव सुरू होण्यापूर्वीच एका तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर आज नागपुरातील पालकांनी मुलांच्या हाती हा जीवघेणा मांजा लागू नये, याची विशेष काळजी घेतल्याचे सुखद चित्र बघायला मिळाले. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण आणि उत्सव साजरा करताना कुणालाही इजा होणार नाही, याची काळजी बच्चे कंपनी घेत आहेत. उत्सव हा उत्सवाप्रमाणेच साजरा व्हावा, या उद्देशाने आज नागपूरकर यावर्षीची मकरसंक्रांत साजरी करणार आहेत.
बच्चे कंपनीचा संकल्प
पर्यावरणाची हानी होईल, असे कुठलेही कृत्य आम्ही करणार नसल्याचे लहान-लहान मुलांनी सांगितले आहे. आज आणि भविष्यातदेखील मकरसंक्रांतीमध्ये पतंग उत्सव साजरा करताना प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजाचा उपयोग करणार नसल्याचेदेखील या मुलांनी सांगितले आहे.