नागपूर - नागपुरात लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला गुन्हेशाखा पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी या टोळीतील पाच महिलांसह एका पुरुषाला अटक केली आहे. शर्मिला खाकसे (५०), शैला विनोद मंचलवार (३२), लक्ष्मी अमर राणे (३८), मनोरमा ढवळे, पूजा पटले (४०) आणि सुरेंद्र पटले (४४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे ही संपूर्ण टोळी महिलांद्वारे संचालित केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी अटक केलेल्या या टोळीने अनेक लहान मुलांची विक्री केल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं आहे. नागपूर गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्याआधी पोलिसांनी खोट्या ग्राहकाला तयार केले, त्याने आरोपी शर्मिला खाकसे या महिलेशी संपर्क साधून 4 वर्षांच्या मुलीचा अडीच लाखात सौदा केला. सौदा होताच पोलिसांनी धाड टाकून टोळीतील ५ महिलांना अटक करत, ४ वर्षीय मुलीची सुटका केली. या टोळीत आणखी आरोपी सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
आरोपी महिलेने स्वतःच्याच मुलीला विकले
या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिसांनी सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी शैला मंचलवारने आपल्या 12 दिवसांच्या मुलीला एका दाम्पत्याला विकल्याची माहिती समोर आली आहे.
अडीच लाखात मुलगी तर साडेतीन लाखांमध्ये मुलाची विक्री
ही टोळी अडीच लाखात मुलगी तर साडेतीन लाखांमध्ये मुलाची विक्री करायची, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.