नागपूर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress MH President) खोटे बोलत आहेत, 'मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत नाना पटोले (Nana Patole) आहेत'. देशाचे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याबद्दल बोलून गावातील गाव गुंडाबद्दल बोलल्याचे सांगून ते खोटं बोलत आहेत. नाना पटोले हे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून काढा, अन्यथा काँग्रेस नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
कोराडी पोलीस स्टेशन येथे नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन केलं म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मात्र, ज्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान यांच्याविरोधात भावना भडकवण्याचे काम करत होते, त्या ठिकाणी चारशे लोकांची गर्दी केली असतानासुद्धा पटोलेंवर गुन्हा दाखल झाला नाही. हा सत्तेचा गैरवापर आहे. पोलीस विभाग राज्य सरकारच्या दबावात काम करत आहे. त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका बावनकुळे यांनी स्पष्ट केली आहे. जोपर्यंत नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
- नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढा -
नाना पटोले म्हणजे आता मिस्टर नटवरलाल बनून खोटे बोलण्याचे काम करत आहेत. मिडियासमोर आणलेला सुरेश घरडेला मोदी म्हणून आणले पण त्या गुंडावर मागील तीन वर्षात कुठलीही केस नाही. नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून काढले नाहीतर काँग्रेसची वाईट अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्या उमेश घरडेची नार्को टेस्ट करा म्हणजे तो खोटं बोलत आहे हे स्पष्ट होईल. याचा पर्दाफाश कोर्टात करू, असेही बावनकुळे म्हणाले.
- नाना पटोलेंना सत्तेतून बाहेर पडावे -
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसे यांच्या भूमिकेबद्दल शरद पवार म्हणाले की, कलाकार आहे म्हणून काम करतात. तेच दुसरीकडे मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्हीच सिनेमा चालू देणार नाही असे म्हटले. त्यामुळे नाना पटोले यांनी आता हा राजकीय सिनेमा बंद करावा. त्यामुळे पटोले यांचे महात्मा गांधींवर प्रेम असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे बावनकुळे यावेळी म्हणाले.
- पोलिसांच्या आशीर्वादामुळे अवैध धंदे सुरू -
नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फार्महाऊसमध्ये बैलांच्या शर्तीत जे पेंडॉल आहे त्यात अश्लील प्रकार सुरू आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात सट्टा, जुगार, रेतीचे अवैध धंदे सुरू आहेत. याकडे पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. हफ्ते बांधून असल्याने पोलीस विभागाच्या परवानगी शिवाय असे धंदे सुरू राहूच शकत नाही, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.