नागपूर - आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाची औपचारिकता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. सध्या ज्या पक्षाचा आमदार तिथून निवडून आला आहे, ती निश्चित जागा एकमेकांना मागायची नाही, असा निर्णय झाल्याचे देखील ते म्हणाले.
नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटनांची आढावा बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. याबैठकी दरम्यान भाजपचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाची बातमी पुढे आली. बैठक आटोपल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. ते म्हणाले की, पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात युतीच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण केली जाणार आहे. सध्या ज्या पक्षाचा आमदार ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आला आहे. ती जागा एकमेकांनी मागायची नाही, असा निर्णय झाल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाल्यानंतर आता कोणत्या नेत्याचा नंबर आहे, असे चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की ईडीची चौकशी लावायला 2 पेक्षा जास्त वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे मुळात हा आरोप चुकीचा आहे. 25 वर्षांपूर्वी धक्कामार स्कुटरवर फिरणारे नेते जर आज 500 कोटींचे मालक झाले असतील तर त्यांनी इतकी माया कुठून जमवली याची चौकशी करण्यात गैर काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आरक्षणासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य चुकीचे नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाचा आढावा घेतला पाहिजे, यावर जे विचार त्यांनी मांडले होते त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपले मत व्यक्त केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.