नागपूर - बैल पोळ्याच्या पाडव्याला नागपूरसह पूर्व विदर्भात तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. ही ऐतिहासिक परंपरा असलेल्या या पोळ्याची सुरूवात व या परंपरेचं जतन राजे राघुजी भोसले यांनी केले आहे. आजही ही परंपरा जशास तशी जोपासण्यात येत आहे. भोसले कुटुंबीयांनी तर गेल्या २१५ वर्षांपासून नंदीबैल उत्सवाचा ऐतिहासिक वारसा जपला आहे. मंगळवारी तान्हा पोळ्याच्या निमित्ताने भोसले वाड्यात मोठा लाकडी नंदीबैल वाड्याच्या प्रवेशद्वारा समोर ठेवण्यात आला होता.
शाही नंदीची आकर्षक सजावट -
मुलांना बैलांच्या कष्टाचे महत्व कळावे म्हणून सुरू करण्यात आलेल्या तान्हा पोळ्याच्या परंपरेला आज दोनशेपेक्षा अधिक वर्ष झाली आहेत. तान्हा पोळ्याच्या निमित्ताने नागपुरातील राजे मुधोजी भोसले यांच्या वाड्यात विशेष तयारी केली होती. कोरोनामुळे यंदा बैलांची मिरवणूक निघाली नसली तरी शाही घराण्याच्या शाही नंदीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी नंदीच्या पायात चांदीचा तोडा देखील घालण्यात आल्या होता.
महाल परिसरात भरायचा पोळा -
इतिहासातील माहितीनुसार, भोसले काळ सुमारे ३०० वर्षे जुना आहे. तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा देखील दोनशे ते सव्वा दोनशे वर्षांची आहे. मुलांमध्ये बैलांप्रती प्रेम निर्माण व्हावे यासाठी तान्हा पोळाच्या सणाची सुरूवात करण्यात आली होती. तेव्हापासून नागपुरात महाल परिसरात मोठा पोळा भरावला जात होता. यामध्ये सर्व समाजातील आणि धर्मातील माणसे सहभागी होत होती. तीच परंपरा आजही कायम आहे. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर यंदा हा पोळा मोठा भरवण्यात आला नव्हता.
हेही वाचा - नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे कडक निर्बंध लागण्याचे संकेत