नागपूर - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेचा केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सरकार विरुद्ध आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुढे करत आज भारतीय जनता पक्षाकडून राज्यभरात एक हजार ठिकाणी आंदोलन करण्यात आले. नागपूर शहरात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली मानेवाडा चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतप्त झालेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकात धरणे द्यायला सुरुवात केल्याने चहूबाजूने वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून बावनकुळे यांच्यासह आंदोलकांना रस्त्याच्या पलीकडे स्थानांतरीत केले. त्यामुळे कार्यकर्ते आणखीच संतप्त झाले होते. राज्य सरकार पोलिसांचा वावर करून ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. सरकारने दगाबाजी केल्यानंतर आता ओबीसी समाज जागृत झाला असून यापुढे मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
हे ही वाचा -आंदोलनाची नौटंकी करून भाजपला आपले पाप झाकता येणार नाही, हिंमत असेल तर मोदींविरोधात आंदोलन करा - पटोले
बावनकुळेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप -
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी राज्य सरकारच आहे, इतकेच नाही तर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळू नये या कटातील झारीचे शुक्राचार्य हे राज्याच्या कायदा आणि न्याय विभागाचे प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हे ही वाचा - महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला - गोपीचंद पडळकर
पोलिसांकडून बळाचा वापर -
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांनी चौकातच ठिय्या दिल्याने शेकडो कार्यकर्तेही त्यांच्या समर्थनात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून बावनकुळे आणि आंदोलकांना रस्त्याच्या पलीकडे नेल्याने आंदोलक संतप्त झाले होते.
मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही -
ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. सरकारला सर्व पक्षांची मदत असताना सरकारने आरक्षण टिकवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने ओबीसी समाजाला धोका दिलेला आहे. त्यामुळे आता ओबीसी समाज राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.