नागपूर - नागपूर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकर या दिव्यांग तरुणाच्या कुटुंबाची आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ठवकर कुटुंबियांसह सर्वांचे मत जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी मनोज ठवकर यांच्या मृत्यूसाठी दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सीआयडीकडे सोपवला आहे. याचे फडणवीस यांनी स्वागत केले आहे. राज्य सरकारने मनोज यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी. तसेच, मनोज यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत घ्यावे अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
'मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे याबाबत बोलणार'
मनोज काही कामानिमित्त बाजारात गेले होते. तेथून घरी परत येत असताना पारडी परिसरात पोलिसांची नाकाबंदी कारवाई सुरू होती. यामध्ये ड्रिंक अँड ड्राइव्हसह मास्क न घातलेल्या वाहनचालकांना दंड केला जात होता. त्यावेळी मनोज देखील तिथून जात असताना, पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, मनोजने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत, गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा वाहनचालक पळून जात असल्याचे पाहून पोलीसही त्याला आडवे झाले. तेव्हा, मनोजच्या दुचाकीची धकड पोलिसांच्या वाहनाला लागली. त्यावर चिडलेल्या पोलिसांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी मनोजला पारडी पोलीस ठाण्यात नेऊन पुन्हा मारहाण केली. त्यामध्ये मनोज बेशुध्द झाला. पोलिसांनी तत्काळ जवळील भवानी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी मनोजला मृत घोषीत केले.
'दोन लाखांची मदत जाहीर'
एका दिव्यांग व्यक्तीला दोन दंडे तुटेपर्यंत मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मनोज यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आहे. त्यामुळे राज्य ठवकर कुटुंबियांना आर्थिक मदत राज्य सरकारने करणे अपेक्षित आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्याने, ठवकर कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. राज्य सरकारने ठवकर कुटुंबियांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून तत्काळ मदत केली पाहीजे. तसेच, भारतीय जनता पक्षातर्फे २ लाख रुपयांची मदत मनोज यांच्या कुटुंबाला देणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. दरम्यान, मनोज यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये या आधीही समवून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
'लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये १४ टक्क्यांची वाढ'
लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात १४ टक्क्यांनी गुन्हेगारी घटनांत वाढ झाली असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. एकीकडे कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन असताना सर्व जनता घरात होती. तर, गुन्हेगारी घटनांची टक्केवारी वाढली कशी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.