नागपूर - नागपुरात अमली पदार्थ विरोधी पथकाने १३ लाख ७ हजार रुपये किंमतीचे २५६ ग्राम एमडी ड्रग्स पावडरसह अन्य साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नागपुरातील आतापर्यंतची ही मोठी कारवाई आहे.
नागपुरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ड्रग तस्कर सक्रिय झाले असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई देखील सुरू केली आहे.
पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, मुंबई येथील आमीर खान आतीक खान याने नागपूर येथील कुख्यात ड्रग्स तस्कर मोहम्मद आमीर मुकीम मलीक याला मोठया प्रमाणात एमडी हे ड्रग्स पाठवले होते. त्या ड्रग्सची खेप आरोपी फुलसिंग उर्फ सोनू सोहनसिंग पठ्ठी (३०) हा घेऊन येणार आहे, अशी माहिती मिळाल्याने एनडीपीएस पथकाने सापळा रचून वर नमूद आरोपीस अटक केली.
२५६ ग्रॅम एमडी जप्त -
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २५६ ग्रॅम ( MEPHEDRONE ) एमडी ड्रग पावडर जप्त केली आहे. ज्याची किंमत १० लाख २४ हजार रुपये इतकी आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रशात विश्वराम सुटे, मोहम्मद आसीफ वल्द रियासत अली असारी, अजहर मजहर पटेल यांना अटक केली आहे.
ड्रग्स तस्कर मोहम्मद आमीर मुकीम मलीक रेकॉर्डवरील गुन्हेगार
कुख्यात ड्रग्स तस्कर मोहम्मद आमीर मुकीम मलीक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आमीर खान आतीक खान आणि यश पुनियानी हे ड्रग्स तस्करीच्या गुन्ह्यात फरार असून, एकूण ७ आरोपींच्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायदा कलम २१ ( क ) २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१० लाखांच्या ड्रग्ससह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
एमडी संदर्भात नागपूर पोलिसांची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. आरोपींवर एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे कायदेशीर कारवाई केली. तसेच त्यांच्या ताब्यातील सहा मोबाईल, विविध कंपनीच्या तीन मोटारसायकली असा एकूण २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.त्यामुळे ड्रग्ससह जप्तीच्या एकूण मुद्देमालाची किंमत १३ लाख ७ हजार ५०० रुपये आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे १५० सुपर स्प्रेडर, शोधमोहीम सुरू
हेही वाचा - रजनीकांत राजकारणात येणार की नाही?, सस्पेन्स कायम