नागपूर- शहरातील भूखंड व मालमत्ता बळकवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. या संदर्भात नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. नागपुरातील पोलीस जिमखाना येथे पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. शहरात वाढलेल्या भूखंड बळकावण्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. यावेळी नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा-नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी स्वीकारला पदभार
शहरात शांतता व सुव्यवस्था टिकवून राहण्यासाठी विकृतींना वेळीच आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. नागपूर पोलिसांकडूनही त्यादृष्टीने कार्य सुरू आहे. म्हणूनच शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात यश मिळत असल्याचेही गृहमंत्री यांनी सांगितले. डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त करत, डॉ. उपाध्याय यांच्या सक्षम पोलीस प्रशासनामुळे नागपूरवरील ‘क्राईम कॅपीटलचा टॅग’ काढण्यात गृह विभाग यशस्वी झाले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष व निर्णयक्षम अधिकाऱ्यांचा सार्थ अभिमान आहे,अशी भावनाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली.
कोरोना लढाईत पोलीस दलाने उत्तम काम केले आहे. १६५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाले. परंतु असे असले तरी पोलिसांनी कोरोना प्रतिबंध करण्यात उत्तम कामगिरी बजावल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
सांघिक कामगिरीच्या बळावरच नागपूरमध्ये पाचव्यांदा चांगले काम करु शकलो, असे मत उपाध्याय यांनी व्यक्त केले. नागपूरकर प्रेमळ व शांत असून दोन वर्षाच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर वचक बसवण्यात यशस्वी ठरल्याचे उपाध्याय यांनी सांगितले.