नागपूर - देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. सर्वत्र बाजारपेठांना नियमावलीनुसार दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली. असे असले तरी अनेक स्टेशनरी व्यावसायिकांनी दुकाने सुरू केले खरे, परंतु विक्रीच होत नसल्याने दुकाने सुरू करून करायचे काय ? असा सवाल नागपुरातील स्टेशनरी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये बंदच मग विक्री होणार तरी कशी, असा प्रश्न स्टेशनरी विक्रेते उपस्थित करत आहे.
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये अजूनही बंदच असल्याने शैक्षणिक प्रणाली देखील थांबल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम स्टेशनरी विक्रेत्यांवर झाल्याचे दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालयाये बंद असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरजच भासत नाहीये. त्यामुळे स्टेशनरीची विक्री देखील थांबली आहे. या विक्रीत कमालीची घट झाल्याचे स्टेशनरी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे नागपूर हे विदर्भातील मोठे शहर असल्याने येथे मोठी बाजारपेठ आहे.
नागपुरातूनच संपूर्ण विदर्भात स्टेशनरी साहित्याची देवाण घेवाण चालत असते. परंतु आता ते ही थांबल्याचे दिसून येत आहे. सोबतच काही स्टेशनरी विक्रेत्यांनी दुकानेच उघडली नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जून, जूलै या महिन्यात शालेय शैक्षणिक सत्राची सुरूवात होते. तेव्हा शालेय साहित्यांची विक्री देखील कमालीची असते. परंतु गेल्या काही महिन्यापासून शैक्षणिक प्रणालीच ठप्प झाली आहे. त्यामुळे शाळाच सुरू नाही तर स्टेशनरी साहित्याची विक्री होणार कशी ? हाच सवाल विक्रेते उपस्थित करत आहे. आता तर या स्टेशनरी विक्रेत्यांनी खरेदी केलेल्या साहित्यांवर अक्षरशः धूळ जमा होत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे पालक वर्गाकडून अॉनलाईन शिक्षण प्रणालीचा स्वीकार झाल्याने स्टेशनरीचा खर्च होतच नसल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या अॉनलाईन शिक्षण प्रणालीने बुक,पेन,कंपास याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
खासगी कार्यालयांनाही स्टेशनरी साहित्य लागतात परंतू या कार्यालयांची कामे आता घरुन सुरू आहेत. अशावेळी त्या साहित्यांची देखील विक्री थांबली. त्यामुळे दुकानातील साहित्यांची विक्री कशी होणार ? ही चिंता स्टेशनरी विक्रेत्यांना अस्वस्थ करत आहे. या सोबतच याच स्टेशनरी दुकानांमध्ये काम करणाऱ्या माणसांवरही याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी शाळा, महाविद्यालये लवकर सुरू होईल हाच आशावाद या स्टेशनरी विक्रेत्यांना आहे.