नागपूर : शहरातील तहसील पोलिसांनी एका 59 वर्षीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक केली ( Nagpur City Police ) आहे. सत्यविजया नारनवरे (59) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. वयस्कर असल्याने तिच्यावर कुणालाही संशय येत नव्हता. मात्र चोरीच्या घटनेनंतर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा या महिलेचा चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आढळून आला. त्याच्या आधारे पोलिसांनी सत्यविजया नारनवरे हिला अटक केली ( 59 Year Old Thief Lady Arrested ) आहे. पोलिसांनी या महिलेकडून तब्बल 5 लाख रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे.
आरोपी सत्यविजया नारनवरे हिने चोरी करण्याची आगळी वेगळी पद्धत शोधून काढली होती. भाड्याने घर शोधत आल्याचं ती दाखवत आणि त्याचवेळी रेकी सुद्धा करत. ज्या घरात पुरुष मंडळी नसायचे त्यात घरात प्रवेश करत. दुपारच्या वेळी एकतर महिलाच घरात असतात किंवा शेजारी गप्पा मारत बसलेल्या असतात. हीच संधी साधून आरोपी सत्यविजया नारनवरे घरात शिरून हात साफ करत असे. या दरम्यान घरातील महिला बाहेर आल्यास भाड्याची खोली मिळेल का असा प्रश्न विचारून वेळ मारून नेत असे. त्यामुळे तिच्यावर कुणालाही संशय येत नव्हता. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अश्या प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी एका चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सत्यविजया नारनवरे ही महिला त्यात दिसली. त्याआधारे पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबुल केला आहे.
पाच लाखांचा मुद्देमाल जप्त: आरोपी चोर महिला सत्यविजया नारनवरे हिला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा घरात पाच लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सत्यविजया नारनवरे यांनी कुठे-कुठे हातसाफ केला आणि कितीचा मुद्देमाल लंपास केला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.