नागपूर - संपूर्ण मराठवाडा आणि काही प्रमाणात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, ज्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी ही मागणी सर्वच राजकिय पक्षांकडून केली जात आहे. या संदर्भात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनुकूलता दाखवली आहे.
मराठवाड्यात १७ लाख हेक्टर जमिनीवरील शेतीचे नुकसान -
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठवाडा येथे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला असून जवळ-जवळ ८० ते ८१ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत ही केंद्र आणि राज्य सरकारने मिळून करायची आहे. ओला दुष्काळ महाराष्ट्रात जाहीर करायचा की काही जिल्ह्याच्या बाबतीत निर्णय घ्यायचा, याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मराठवाड्यात १७ लाख हेक्टर जमिनीवरील शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
८१ टक्के पंचनामे पूर्ण -
यावर्षी प्रचंड पाऊस, वादळे, महापूर यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कालच मराठवाड्यांचा आढावा घेतला आहे. मागच्या दोन दिवसापूर्वीच्या शेतकऱ्यांचा नुकसानीचा आकडा मोठा आहे. अशा वेळेस पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री दिले आहेत. मी पण माझ्या विभागाच्या माध्यमातून निर्देश दिले आहेत. आतापर्यंत ८१ टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. पूर आणि पाऊस ओसरला सर्व पंचनामे पूर्ण होतील, त्यानंतर मदतीच्या विषयावर निर्णय घेतला जाणार आहे.
ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय -
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायचा की काही जिल्ह्याच्या संदर्भात निर्णय घ्यायचा यावर चर्चा सुरू आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले असताना आता गुलाब वादळामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या संदर्भात जिल्हा स्तरावरील सर्व माहिती उपलब्ध झाल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
विजय जावंधीया यांना वाटणारी भीती रास्त -
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढावे असा सल्ला शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे दिला आहे. शेतकऱ्यांना मदतचा हात दिला नाही तर पुन्हा आत्महत्याच्या घटनांमध्ये वाढ होईल अशी भीती जावंधीया यांनी व्यक्त केली आहे. यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील विजय जावंधीया यांना वाटणारी भीती रास्त असल्याचे म्हटले आहे. मला देखील मराठवाड्याच्या संदर्भात ती भीती आल्याचे ते म्हणाले आहेत. मराठवाड्यातील ८ पैकी ७ जिल्ह्यात १७५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र कर्ज काढण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असे ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - राज्यात अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी ७२९ कोटींचा निधी वितरीत; मदतीच्या आकडेवारीने भुवया उंचावल्या