नागपूर - आज एकाच दिवशी नऊ कोरोनाबाधित समोर आल्यानंतर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा थेट ७२ झाला आहे. आज पुढे आलेल्या सर्व रुग्णांचे 'सतरंजीपुरा कनेक्शन' समोर आले आहे. 5 एप्रिलला मृत्यू झालेल्या 68 वर्षाच्या व्यक्तीशी संपर्क आल्याने 40 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज एकाच दिवशी आणखी नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याचे प्रशासनापुढील आव्हान आणखी वाढले आहे.
नागपुरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ६३वरून थेट ७२वर उसळी घेतली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ७२ पैकी ४० रुग्णांचा संपर्क मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान दगावलेल्या एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांशी आल्याचे उघड झाले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातलग सातरंजीपुरा, मोमीनपुरा, शांती नगर आणि कुंडलाल गुप्ता परिसरात वास्तव्यास आहेत. हे सर्व संबंधित व्यक्तीला भेटायला गेल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट होताच प्रशासन त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान अहवालातून झाले आहे.
५ एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या व्यक्तीला चार मुली, एक मुलगा आणि अनेक नातवंड असे एकूण २१ सदस्य आहेत. हे सर्व कोरोनाबधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर ते किराणा मालाचे दुकान, मेडिकलसह परिसरातील खासगी रुग्णालय आणि इतर अनेकांच्या संपर्कात आले. यापैकी अनेकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र, वृद्धावर उपचार करणारा डॉक्टर आणि असिस्टंटला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित वृद्ध आजारी असताना अनेकजण प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. नंतर ते अनेकांच्या संपर्कात आल्याने एकूण १९२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी ३७ लोकांना कोरोनाची लागण झालीय. तर, १४४ लोकांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत.
या व्यतिरिक्त केवळ ११ लोकांचीच कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. येत्या काळात १४४ पैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान होण्याची शक्यता असल्याने शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढणार असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.