नागपूर - शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध फुटाळा तलावात एका वीस वर्षीय तरुणाने त्याच्या बाईकसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अथर्व आनंदेवार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मात्र, त्याने आत्महत्या करण्यामागील कारणांचा उलगडा होऊ शकलेले नाही. मात्र, घटना संशयास्पद वाटत असल्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
अथर्वने आज दुपारी बाराच्या सुमारास आपल्या काही मित्रांना, मी फुटाळा तलावात उडी घेत असल्याचे मेसेज केला असल्याची माहिती समोर आली आहे. अथर्वचा मेसेज मिळताच त्याच्या मित्रांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याने आपल्या दुचाकीसह तलावात उडी घेतली होती. अनेक तास प्रयत्न केल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास अथर्व दुचाकी आणि त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. अथर्वने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अथर्व नागपूरच्या वाडी परिसरातला राहणारा होता.
आत्महत्यामागील कारणं शोधण्यासाठी पोलीस करणार मित्रांची चौकशी -
अथर्व आनंदेवार या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी मित्रांना मेसेज केला होता, ज्यामध्ये त्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. एकूणच हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने पोलीस या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याकरिता मित्रांसह कुटुंबातील सदस्यांची चौकशी करून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे.