नागपूर - बलात्कारांच्या घटनेने पुन्हा एकदा शहर हादरलंय. पारडी परिसरात 19 वर्षाच्या तरुणीवर 52 वर्षाच्या नराधमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामठी येथील सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. योगीराज रहांगडाले, असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा रोडवरील एका औद्योगिक वसाहतीतील सूत गिरणीमध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय महिला कामगारावर तिथल्याच पर्यवेक्षकाने पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला हेतू साध्य करण्यासाठी या नराधमाने पीडितेला एकटे पाहून आधी तिच्यावर गुंगीच्या स्प्रेचा वापर केला होता. आरोपीने बलात्कारानंतर तिच्या गुप्तांगात धातूची वस्तू टाकून तिला जखमीही केले.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, 21 जानेवारीच्या रात्री तिच्यासोबत खोलीत राहणारी तिची मैत्रीण आणि भाऊ बाहेरगावी गेलेले होते. त्याचाच फायदा घेत सूतगिरणीतील पर्यवेक्षक असलेल्या योगीराज रहांगडालेने तिच्या खोलीत प्रवेश केला. काही समजण्याच्या आधीच त्याने तरुणीच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला. त्यामुळे पीडिता बेशुद्ध झाली. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर तिला आपल्यासोबत झालेल्या प्रकराची जाणीव झाली. वेदनेमुळे पीडिता किंचाळली तेव्हा शेजारी राहणाऱ्या कामगारांनी तिकडे धाव घेतली. पीडितेची अवस्था पाहून तिला रुग्णालयात दाखल केले. 3 दिवस उपचार घेतल्यानंतर पीडितेने 25 जानेवारीला पारडी पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पर्यवेक्षक योगीराज रहांगडालेला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.