नागपूर - नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस स्टेशन हद्दती एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच महिन्यापूर्वी घडलेली अत्याचाराची घटना आता समोर आली आहे. ३१ वर्षीय युवकाने १६ वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकारणाची तक्रार मौदा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशाल मेश्राम, असे अटकेतील युवकाचे नाव आहे.
आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी-
विशाल हा सिमेंट कंपनीत काम करतो. पीडित मुलगी शाळा शिकत आहे. पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपी विशाल हा मुलीच्या घरात घुसला. आरोपीने पीडित मुलीचे हातपाय दोरीने बांधून अत्याचार केला. त्यानंतर घटनेची वाच्यता कुठे केल्यास तुझ्या भावाला ठार मारेल, अशी धमकी सुद्धा आरोपीने त्या पीडितेला दिली. त्यानंतर हे प्रकरण पुढील पाच महिने पुढे आलेच नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाची तक्रार मौदा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी विशालला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नंदा पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पाच महिन्यांनी घटना उघडकीस-
काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती अचानक खालावली तेव्हा नातेवाइकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी विचारणा केली असता, आरोपी विशाल याने अत्याचार केल्याचे तिने नातेवाइकांना सांगितले त्यानंतर मुलीसह नातेवाइकांनी मौदा पोलीस स्टेशन गाठले. विशाल याच्याविरूद्ध तक्रार दिली. मौदा पोलिसांनी विशाल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रक्तस्रावामुळे मुलीचा गर्भपात-
ज्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेव्हा तिच्या पोटात दुखत असल्याचं तिने डॉक्टरांना सांगितले. त्याचवेळी तिला रक्तस्राव होत असल्याने तिचा गर्भपात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा- 'संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा'