मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या विषयावर पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. ई-कॉमर्स कंपनीच्या ऍपमध्ये मराठीचा समावेश असावा ही मागणी करत मनसे अॅमेझॉन विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अॅमेझॉनने मराठीला स्थान द्यावे, अशी मुख्य मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मात्र, अॅमेझॉन व्यवस्थापनने या मागणीला मान्य करण्यास तयार नसल्याने मनसेचे कार्यकर्ते अमेझॉन विरोधात आक्रमक झाले असून त्यांनी पोस्टरबाजी सुरू केली आहे.
अॅमेझॉन विरोधात पोस्टरबाजी -
अॅमेझॉन व्यवस्थापनाच्या विरोधात मनसेने मोर्चा उघडला आहे. आहे. घाटकोपर भागातील कंपनीच्या वेअरहाऊस बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी 'तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदारी, मराठी नाही तर अॅमेझॉन नाही', अशी पोस्टर लावली आहेत. यानंतर या भागात वातावरण तापले आहे.
अॅमेझॉन विरोधात मोहीम -
अॅमेझॉन अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश असलाच पाहिजे ही मनसेची मुख्य मागणी आहे. मात्र, ऍपमध्ये मराठी भाषेचा यात समावेश करता येणार नाही, असे अॅमेझॉनकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. त्यामुळे मनसेने आक्रमक होत अॅमेझॉन विरोधात मोहीम सुरू केली आहे.