मुंबई - अमरमहल पुलाजवलील एसआरए प्रकल्पातील सोसायटीत राहणाऱ्या प्रतिभा शिनगारे(वय 11) नामक मुलीच्या डोक्यावर सिमेंटचा ठोकळा पडल्याने तिचा मृत्यू झाला होता. पंचशील सोसायटीमध्ये सोमवारी (दि.18नोव्हें)ला सकाळी घडलेल्या घटनेनंतर संबंधित जबाबदार असणाऱ्या विकासकाला अटक करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. यासाठी टिळकनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पंचशील नगर येथील एसआरए प्रकल्पाअंतर्गत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्या इमारतीत काही रहिवासी राहत असून, करुणा खरात नामक महिलेची या 14 व्या मजल्यावर सदनिका आहे. करुणा यांच्यासोबत त्यांच्या भावाची मुलगी-प्रतिभा शिनगारे रहात होती. इमारतीच्या प्रवेशद्वारावर येताच अचानक इमारतीवरून सिमेंटचा ठोकळा प्रतिभाच्या डोक्यावर पडला. यामध्ये संबंधित मुलगी जखमी झाली. थोडयाच वेळात नातेवाईकांनी तिला घाटकोपराच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांना केईम रुग्णालयात उपचारासाठी हालवण्याचा सल्ला दिला. काल रुग्णालयात उपचारा दरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.
याबाबत नातेवाईकांनी विकासकांच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचा आरोप केला; व टिळक नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन पुकारले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात 449/19 कलम 338 नुसार गुन्हा नोंद केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.