मुंबई - राज्यामध्ये झालेल्या सत्तांतराने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हातूनही सत्ता गेली आहे. विरोधी बाकावर बसावे लागत असल्याने साहजिकच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठे नाराजी आहे तर कोणी रागही व्यक्त करीत आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ) या सत्तांतरावर काहीशा संतप्त झालेल्या दिसत आहेत. आज विश्वास दर्शक ठराव सभागृहात पारित झाल्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण सभागृहात दिसून आले, त्याबाबत त्या व्यथित झाल्या आहेत. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आज ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालेले आहे, जर असं करायचं होतं तर त्यांनी ते अडीच वर्षा पूर्वीच करायचं होतं.
जनतेला दिलेला धोका - यशोमती ठाकूर यांच्यामते हे सरकार जनतेला धोका देऊन आले आहे. जनतेच्या मनातील हे सरकार नसून जबरदस्तीने लादलेलं हे सरकार आहे. शिवसेनेचे ज्या पद्धतीने गटनेते पद व प्रतोद पद हिरावून घेतल गेले आहे, त्याबाबत सुद्धा त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. हे प्रकरण जरी न्यायप्रविष्ठ असले तरीसुद्धा एकंदरीत नजरेसमोर घडणाऱ्या व दिसणाऱ्या घडामोडी या व्यथित करणाऱ्या आहेत असेही त्या म्हणाल्या आहेत.