मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात पर्यटनाला चालना दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून वरळी येथील डेअरीमध्ये ( Worli Dairy In Mumbai ) आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय उभारले जाणार ( International Standard Tourist Complex ) आहे. त्यासाठी या जागेच्या आरक्षणात बदल केले जाणार आहेत. तसा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) सुधार समितीमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
पर्यटन संकुल आणि मत्सालय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२० - २१ चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना विषयांकित जमिनीवर 'आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय' उभारण्यात येईल, असे घोषित केले होते. त्यानुसार, वरळी डेअरीच्या काही जागेत पर्यटन संकुल केले जाणार आहे. उर्वरित क्षेत्रावर विद्यमान शासकीय कार्यालय राहणार आहे. वरळी डेअरीच्या जागेच्या आरक्षणामध्ये बदल करावा लागणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ उक्त अधिनियमाचे कलम ३७ (क) अन्वये बृहन्मुंबई विकास योजना २०३४ मध्ये वरळी दुग्धशाळा, वरळी डिव्हिजन, मुंबई या जमिनी संबंधित प्रस्तावित फेरबदलाबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
सुधार समितीमध्ये मंजुरीसाठी प्रस्ताव
वरळी डेअरीच्या आरक्षित जागेत काही फेरफार करावा लागणार आहे. त्यासाठी हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी घेण्यात आली होती. जागेच्या फेरफार संदर्भात आणि फेरफारीच्या अनुषंगाने राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्याचा अधिकार देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सुधार समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला भाजपकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.