मुंबई - “मधुमेह (Diabetes) टाळण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा (Healthy lifestyle) अंगिकार करा. यामध्ये प्रामुख्याने नियमित व वेळेवर सुयोग्य आहार घेणे, मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार दररोज ठरलेल्या वेळी व्यायाम करणे, पायी चालणे, सायकल चालविणे यासह पुरेशी झोप घेणे, यासारख्या बाबींचा समावेश वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा. त्याचबरोबर ३० वर्षावरील सर्वांनी वर्षातून किमान एकदा आपली मधुमेह चाचणी करवून घ्यावी”, असे मार्गदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी (Additional Commissioner Suresh Kakani) यांनी केले.
काळजी घेणे आवश्यक -
आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान मधुमेह विषयक जनजागृतीपर एका विशेष भित्तीपत्रकाचे प्रकाशन सुरेश काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश काकाणी यांनी सांगितले की, असंसर्गजन्य आजार नियंत्रणावर विशेष भर देऊन प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘कोविड - १९’ या संसर्गजन्य आजारामुळे होणार्या मृत्युंकरिता मधुमेह हा एक महत्त्वाचा जोखमीचा घटक असून नागरिकांनी वेळेत मधुमेहाचे निदान, रक्तातील साखरेचे नियंत्रित प्रमाण व जीवनशैलीतील बदल या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेही रुग्णांचे ‘कोविड - १९’ लसीकरण झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे. मधुमेह प्रतिबंधाकरिता ११ ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत पोस्टर वितरण, माहितीपर होर्डिंग्स, बेस्ट बस थांब्यांवर जाहिराती, रेडिओ संदेश, टी.व्ही जाहिराती आणि समाजमाध्यमांचा वापर याद्वारे जनजागृती करण्यात येईल असे काकाणी यांनी संगितले.
३० वर्षांवरील व्यक्तींनी वर्षातून एकदा तपासणी करा -
जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित उपस्थितांशी संवाद साधताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे (Dr. Mangala Gomare) यांनी आवाहन केले की, महापालिका दवाखान्यांमार्फत पुरविण्यात येणार्या आरोग्य सुविधांचा लाभ जास्तीत-जास्त मुंबईकरांनी घ्यावा. तसेच ३० वर्षांपेक्षा अधिक वय असणार्या सर्व व्यक्तींनी वर्षातून किमान एकदा मधुमेह व उच्च रक्तदाबाकरिता आपली तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर सर्व कॉर्पोरेट कार्यालये आणि कामाची ठिकाणे यांनी आपल्या अधिनस्त कर्मचार्यांची मधुमेह व उच्च रक्तदाब यांकरिता तपासणी नियमितपणे करावी. तसेच कार्यालयीन कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रसार करावा, असेही डॉ. गोमारे यांनी आवर्जून नमूद केले.
मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या अंदाजे ६.४ लाख -
आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटना (IDF) यांच्याद्वारे नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मधुमेह ऍटलास २०२१’ (दहावी आवृत्ती) अहवालानुसार, आपल्या देशातील २० ते ७९ या वयोगटातील अंदाजे ७.४ कोटी प्रौढ लोकसंख्या मधुमेहबाधित असून मधुमेहाच्या जागतिक क्रमवारीत भारत हा दुसर्या क्रमांकाचा देश आहे. तसेच मधुमेह आणि संबंधीत गुंतागुंतींमुळे देशात मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या अंदाजे ६.४ लाख इतकी आहे.
महाराष्ट्रात ९.८% मृत्यू -
‘मृत्यूकारण वैद्यकीय प्रमाणिकरण अहवाल’ (भारत - २०१९) नुसार, महाराष्ट्रात मधुमेहामुळे मृत्यू पावणार्या व्यक्तींचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ९.८% इतके आहे. CRS व MCCD २०१९ नुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रातिन सन २०१९ मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी १२.६% मृत्यू मधुमेह आणि संबंधीत गुंतागुंतींमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. मधुमेह विशेषतः अनियंत्रित मधुमेह हा ‘कोविड - १९’ मुळे होणार्या मृत्युंकरिता एक महत्त्वाचा जोखमीचा घटक आहे. कोविडमुळे महापालिका क्षेत्रात मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांपैकी साधारणतः ३९% रुग्ण मधुमेही असल्याची बाब समोर आली आहे. कोविड संसर्गबाधित मधुमेही रुग्ण हे उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड विकार इत्यादींनी ग्रस्त असल्यास त्यांना देण्यात येणार्या उपचारांची परिणमकारकता व संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण यावर मोठा परिणाम दिसून येतो.
१५ वर्षांवरील १७.५ टक्के व्यक्तींमध्ये शर्करा -
‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५’ (२०१९-२०) नुसार मुंबईतील १५ वर्षांवरील साधारणतः १७.५ टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक शर्करा प्रमाण आढळले आहे. मुंबईतील दर ५ पैकी १ प्रौढ व्यक्तीमध्ये रक्तशर्करेची पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असून ती पूर्वमधुमेह किंवा मधुमेहाच्या श्रेणीत गणली जाऊ शकते.
हेही वाचा - Health Minister on vaccination : नोव्हेंबर अखेर राज्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न - राजेश टोपे