मुंबई - कोरोनाच्या भीतीने मुंबईसह महाराष्ट्रातून गावी परत गेलेल्या बांधकाम क्षेत्रातील मजुरांना परत आणण्यासाठी कंत्राटदार-बिल्डर जोरदार प्रयत्न करत आहेत. रेल्वेचे भाडे, राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय करतो, इतकेच नव्हे तर आगाऊ पगार देतो, अशा पंचतारांकित ऑफर ते देत आहेत. पण त्यानंतरही स्थलांतरित मजूर परत येण्यास नकार देत आहेत. त्यामुळे बिल्डर आणि कंत्राटदार मोठ्या पेचात पडल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या स्थलांतरीत मजूरांची संख्या सर्वाधिक आहे. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम या राज्यातील हे मजूर आहेत. पण मागील दोन महिन्यात अंदाजे 70 टक्के मजूर गावी परतला आहे. आता अनलॉकमध्ये कामासाठी परवानगी मिळाली आहे. पण काम करायला मजूरच नाहीत अशी परिस्थिती आहे. नवी मुंबईतील प्रजापती समुहाच्या तीन प्रकल्पात 200 मजूर होते. मात्र आजच्या घडीला केवळ 35 मजूर काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी एक प्रकल्प पूर्ण बंद ठेवला असून दोन प्रकल्पात अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. दरम्यान, ते आणि त्यांच्या कंत्राटदाराकडून या मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रजापती समूहाचे सर्वेसर्वा राजेश प्रजापती यांनी सांगितले आहे.
मजुरांना येण्याचे भाडे, येथे आल्यानंतर राहण्या-खाण्या-पिण्याची योग्य ती सोय, आधीचा रखडलेला पगार आणि पुढचा आगाऊ पगार देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र त्यानंतरही हे मजूर परत येण्यास नकार देत आहेत, असेही ते म्हणाले. मुंबई-महाराष्ट्रातील परिस्थिती ठीक होत नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही असे कुणी, तर कुणी आम्ही तयार आहोत मात्र आमचे कुटूंबीय आम्हाला पाठवत नाहीत, असे सांगत आहेत. त्यामुळे आता पुढे काय हा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचेही प्रजापती म्हणाले.
प्रजापतीप्रमाणेच एवायजी रिऍलिटीचेही दोन प्रकल्प बंदच आहेत. 20 टक्के मजूरांमध्ये काम कसे करायचे असा प्रश्न उभा ठाकल्याचे एवायजीचे प्रमुख आनंद गुप्ता यांनी सांगितले आहे. मुळात आमची थकित रक्कम संबंधित यंत्रणांकडून मिळालेली नाही. मजुरांना द्यायला पैसे नाहीत. मात्र पदरमोड करत आम्ही मजुरांना परत येण्याची गळ घालत आहोत. त्यांना आगाऊ पगार ही देण्याची तयारी आहे. पण पुढचे काही महिने तर ते यायला तयार नाहीत. त्यामुळे बांधकाम क्षेत्राच्या अडचणी खूप वाढल्या आहेत. ही परिस्थिती सावरायला खूप काळ लागणार असल्याचेही गुप्ता म्हणाले.