मुंबई - मान्सून पूर्व सूचना आणि शेतीविषयक सल्ला देण्यासाठी सुमारे ६ हजार स्वयंचलित हवामान केंद्र ( Automatic Weather Stations ) उभारले जाणार आहेत. परंतु, अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. आधीच मान्सून पूर्वकल्पना मिळत नसल्याने शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे. त्यात हाती घेतलेल्या केंद्रांच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. अवघ्या काहीच दिवसांत मान्सून सुरू होईल. त्यामुळे ही केंद्रे कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
स्वयंचलित केंद्राचा वेग मंदावला - तापमान, वाऱ्याची दिशा, वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, यासाठी राज्य सरकारने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ६ हजार ग्रामपंचायतमध्ये पहिल्या टप्प्यात केंद्र उभारली जाणार आहेत. पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असेल, अशा ग्रामपंचायतींचा प्राधान्याने विचार करून तेथे केंद्र कार्यान्वित करण्याचे राज्य शासनाचा मानस आहे. मात्र येत्या काही दिवसांत मान्सून सुरू होईल. त्यापूर्वी शेतकऱ्यांना शेतमालाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जलदगतीने उपाययोजना करता यावी, यासाठी उभारली जाणारी केंद्राचा वेग मंदावला आहे. त्यामुळे ही लोकोपयोगी केंद्रे लवकरच सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
देशाबाहेरील तंत्रज्ञानाचा वापर करा - आतापर्यंत बसवलेल्या केंद्रातून अतिवृष्टी वादळाबाबत माहिती मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यात केंद्र कमी असल्यामुळे माहिती उपलब्ध होत नाही. शिवाय, सातत्याने हवामान बदल होत असतो. त्यामुळे जलद गतीने माहिती उपलब्ध होईल, अशी यंत्रणा उभारायला हवी. देशाबाहेरील तंत्रज्ञानाचा यासाठी वापर झाल्यास अशा केंद्रांचा हेतू साध्य होईल. तसेच तालुक्यात केंद्र न उभरता मंडळ स्तरावर, गावागावात अशी केंद्र बांधावीत. आवश्यकता असेल ड्रोनचा आधार घ्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होण्यास मदत होईल, असे कृषी अभ्यासक बुधाजीराव मुळीक यांनी सांगितले.
लवकरच कामाला सुरुवात - मान्सून पूर्व सूचना आणि शेतीविषयक सल्ला देण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. सध्या २ हजार ११९ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली आहेत. या केंद्रातून पावसाची आकडेवारी संकलित केली जाते. अतिवृष्टीत होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या स्तरावर ही केंद्रे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ६ हजार ग्रामपंचायतीना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांच्याकडून अभिप्राय येईल, त्या ठिकाणी कामे सुरू केली जातील. लवकरच ही कामे पूर्णत्वास येतील, असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
फळपीक योजनेसाठी केंद्र उपयुक्त - प्रत्येक दहा मिनिटाला हवामान खात्याच्या वेबसाईटवर अपडेट मिळत आहेत. दर २४ तासांनी ते अपडेट होते. तापमान, पर्जन्यमान, आर्द्रतेबाबत संपूर्ण माहिती मिळते. राज्य शासनाच्या प्रत्येक उत्पन्न महसूल मंडळात आतापर्यंत २ हजार ११९ स्वयंचलित हवामान केंद्र उभारली आहेत. तर ६ हजार नव्या केंद्र प्रस्तावित आहेत. हवामान आधारित फळपीक योजनेसाठी ही केंद्र उपयुक्त ठरतील. अतिवृष्टी आणि पर्जन्यमानाची माहिती मिळवणे सोपे जाईल. सध्या दहा ते पंधरा गावांच्या मंडळात एक केंद्र उभारले आहे. त्यामुळे सर्वच गावातील पर्जन्यमान, अतिवृष्टीची नोंद होत नाही. प्रत्येक गावातून अशी केंद्र उभारावी, ही मागणी वाढली आहे. ही हवामान केंद्र स्कायमेंट संस्थेच्या माध्यमातून उभारली आहेत. राज्य सरकारवर याचा कोणताही आर्थिक भार पडत नाही. उलट हवामान संबंधित माहिती विनामूल्य मिळत आहे. यापुढे उभारण्यात येणारी हवामान केंद्र थर्डपार्टी संस्थेकडून बांधून घेणार असल्याचे कृषी विभागाच्या विस्तार व प्रशिक्षण खात्याचे संचालक विकास पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना 'असा' होईल फायदा - केंद्रामुळे पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, शेतकऱ्याला हवामान अंदाज आणि कृषी विषयक सल्ला, पिक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक योजना अंमलबजावणी आणि मार्गदर्शनासाठी ही केंद्र उपयुक्त ठरतील, हा या मागचा उद्देश आहे.
हेही वाचा - मान्सून आला तोंडावर...स्वयंचलित हवामान केंद्राला मिळेना गती