मुंबई - भाजपकडून पार्टी विथ डिफरन्स अशी आपली ओळख सांगितली जाते. मात्र, मुंबई महानगरपालिकेतील दोन माजी महिला नगरसेविकांनी केलेला राडा आणि या आधी एका महिला नगरसेविकेच्या मुलाने कंत्रादाराकडून मागितलेली टक्केवारी यामुळे भाजपाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे. तर पक्षाचे नेते यावर योग्य निर्णय घेतील असे सांगण्यात आले आहे.
या दोन प्रकारामुळे भाजपाची चर्चा - शिस्तबद्ध, सुशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडणारा पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे. मात्र याच भाजपच्या मुलुंड येथील नगरसेविका रजनी केणी यांच्या मुलाने कंत्राटदाराकडून टक्केवारी दे किंवा कंत्राट मागे घे अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर या प्रकरणी भाजपाकडून रजनी केणी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाचे पुढे काय झाले हे समोर आलेले नाही. त्यानंतर घाटकोपर येथील माजी नगरसेविका रितू तावडे आणि माजी नगरसेविका बिंदू त्रिवेदी यांच्या मधील राडा समोर आला आहे. बिंदू त्रिवेदी यांनी आपल्याला मारहाण केल्याचा तसेच त्यांना सोडवायला गेलेले माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप रितू तावडे यांनी केला आहे. या दोन प्रकरणांमुळे भाजपबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.
चौकशी समिती नियुक्त - या प्रकरणी भाजपाने चौकशी समिती नियुक्त केली आहे. पक्षानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. अनुशासन समितीला या प्रकरणात काही आढळले तर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुकुंदराव कुलकर्णी, शलाका साळवी आणि अॅड आरती साठे यांच्या अनुशासन समितीच्या निकषांवर आधारीत योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रितू तावडे यांच्याकडून तक्रारीची प्रत मिळाल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनीही स्पष्ट केले आहे. तर पक्षातील वरिष्ठ नेते या प्रकरणाची योग्य ती दखल घेतील अशी प्रतिक्रिया पालिकेतील भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली आहे.
कसली पार्टी विथ डिफरन्स दाखवण्याचे नाटक - पार्टी विथ डिफरन्स हे भारतीय पार्टीचे दाखवण्याचे नाटक आहे. बजबजपुरी झाली आहे. आम्हाला बाळासाहेबांचा पक्ष कुठे आहे असे विचारात. मात्र बाळासाहेबांचा पक्ष हा त्यांचे विचार आणि विचारधारा घेऊन हजार पावलांनी पुढे गेला आहे. परंतु अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अडवाणी यांच्यासारखे नेते आता भाजपात नाहीत. भाजप हिटलर पक्ष वाटायला लागला आहे. देशात आणि महाराष्ट्रात ते दिसून येत आहे. आज त्यांच्या पक्षातील महिला एकमेकांच्या उरावर बसत आहेत. ते स्वतःच्या पक्षातील लोकांना न्याय देऊ शकत नाहीत ते जनतेला काय न्याय देणार असा प्रश्न मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. सत्त्तेत असलेल्याना नामहरण कसे करायचे, त्यांचा फोकस कसा हलवायचा यासाठी ईडी लावण्याचे प्रकार सुरु आहेत असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.