मुंबई - राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, असे रोखठोक विधान नवी मुंबईतील भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं आहे. मी स्पष्ट बोलते, मला कोणालाही घाबरायची गरज नाही, असा इशारा म्हात्रे यांनी भाजपाला दिला आहे. म्हात्रे यांच्या बोलण्याचा रोख विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गणेश नाईक यांच्याकडे असल्याची जोरदार चर्चा यावेळी रंगली. एका वृत्तपत्राच्या महिला सन्मान कार्यक्रमात म्हात्रे बोलत होत्या.
मी कोणालाही घाबरत नाही -
महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटले गेले. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. त्यावेळी तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझे काम होते. माझे कर्तृत्त्व होते. पण महिलांनी केलेले काम झाकून टाकायचे. त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत, असे प्रकार होत आहेत. मी कोणालाही घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्ष असतात ना आपल्याला साथ द्यायला. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, असा घणाघात आमदार मंदा म्हात्रे यांनी केला.
स्वतःला कमी समजू नका -
दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतर, कर्तृत्व सिद्ध करून दाखवून सुद्धा पक्षाकडून डावलले जात आहे. भाजपाकडून महिलांचा सन्मानच केला जात नाही, गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केला. आपण कधीही स्वतःला कमी समजू नये”, असा मोलाचा सल्ला देखील म्हात्रे यांनी महिलांना दिला. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या.
हेही वाचा - जावेद अख्तर यांनी तालिबानची केली आरएसएससोबत तुलना