मुंबई - वरळी परिसरातील गोपचार सोसायटीत लसीकरणाच्या नावाखाली घरात दरोडा टाकणाऱ्या महिलेला वरळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. दिपाली म्हात्रे असे या महिलेचे नाव आहे. आरोपी महिलेने ५ मे रोजी वरळीच्या गोपचार इमारतीत राहणाऱ्या ७० वर्षीय महिला आणि तिच्या नातवाला घरात चाकूच्या धाक दाखवून साडेचार लाखांचे सोने लुटले होते.
विशेष म्हणजे आरोपी महिला देखील शेजारच्या इमारतीत राहणारी असून तिने ओळख लपवण्यासाठी तोंडाला स्कार्फ बांधला होता. इमारत परिसरात सीसीटीव्ही नसल्याने आरोपी महिलेची ओळख पटवणे कठीण जात होते. अशातच वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंतराव चौधरी यांच्या पथकाने वृद्ध महिलेकडे सखोल चौकशी केल्यानंतर महिलेच्या हातावर झाडाच्या वेलीचे टँटू असल्याचे सांगितले. ही आरोपी महिला जवळचीच व्यक्ती असल्याचा पोलिसांना संशय होता आणि त्यांचा हा संशय खरा निघाला. पोलीस चौकशीत दिपाली वारंवार पोलिस तपासाची चौकशी करत असल्याचे लक्षात आल्याने तिला विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी बोलावले. चौकशी वेळी तिच्या हातावरील टँटूने तिची ओळख पटली. सध़्या दिपाली पोलीस कोठडीत आहे.