मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यायचे की मुंबईत यावरून महाविकास आघाडीतच मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावे यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह आहे. तर अधिवेशन मुंबईतच व्हावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिवेशन मुंबईत व्हावे अशी इच्छा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महाविकास आघाडीत मतभेद?
कोरोनाचे सावट काहीसे दूर झाल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, हे अधिवेशन कुठे घ्यायचे याबाबत अद्याप महाविकास आघाडीतच एकमत झाले नसल्याचे सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीवरून दिसत आहे. विदर्भातल्या जनतेसाठी हे अधिवेशन नागपुरातच व्हावे यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आग्रह आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचे संकट आणि मुख्यमंत्र्यांची प्रकृती पाहता हे अधिवेशन मुंबईत व्हावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कामकाज सल्लागार समितीची बैठक नाही
हिवाळी अधिवेशनापूर्वी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. ७ डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल असे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्याने या अधिवेशनाविषयी आता संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
नागपुरात तयारीला सुरुवात
विधिमंडळाने ठरविल्यानुसार नागपुरात अधिवेशन होणार असल्याने यासाठी नागपुरातील विधान भवनाच्या इमारतीची रंगरंगोटी तसेच अन्य निवासस्थानांच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे. नागपुरात अधिवेशन होण्याची शक्यता जास्त असल्याने ही तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा पुण्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे अद्याप कामकाज सल्लागार समितीची बैठक होऊ शकलेली नाही. अशा स्थितीत नजिकच्या दिवसांत बैठक होण्याची शक्यता नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अधिवेशन आणखी आठवडाभर पुढे ढकलून १४ डिसेंबरपासून नागपुरात घ्यावे, असे विधिमंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे समजते आहे.
अधिवेशनाच्या जागेबाबत पेच
अधिवेशन नागपुरातच व्हावे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे. तर कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असल्याने अधिवेशन मुंबईत व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही असल्याचे समजते आहे. अधिवेशन किमान दोन आठवडे चालावे असे उपमुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. तर अधिवेशन एक आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत उरकावे असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
नागपुरात अधिवेशन घेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आग्रही
नागपुरात अधिवेशन घेतले नाही तर विधिमंडळाच्या नियमाचा भंग होईल आणि विदर्भातील जनतेच्या रोषालाही सरकारला सामोरे जावे लागेल. गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात अधिवेशन झाले नसल्याने आता तरी नागपुरात अधिवेशन व्हावे, असे या दोन्ही पक्षांना वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.