मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस जाहीर करण्यात आला आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी जास्त बोनस जाहीर केल्याने लाखो पालिका आणि हजारो बेस्ट कर्मचारी खुश झाले आहेत. याचा फायदा येत्या निवडणुकीत पालिकेतील सत्ताधारी व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला तसेच महाविकास आघाडीला होणार आहे.
- 20 हजार रुपये बोनसचा निर्णय -
कोरोना विषाणूच्या काळात मुंबई महापालिका आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. याची दखल घेत यावर्षी बोनस वाढवून द्यावा अशी मागणी कामगार संघटनांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या. त्यानंतर पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना 2023 - 24 पर्यंत दरवर्षी प्रत्येकी 20 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे स्वागत कामगार संघटनांनी केले आहे. कामगार संघटनांनी याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यांना दिले आहे.
हेही वाचा - मुंबई : पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 20 हजार रुपये बोनस जाहीर
- शिवसेना आणि आघाडीला फायदा -
मुंबई महापालिकेत सध्या विविध विभागात 95 लाख कर्मचारी काम करत आहेत. शाळांमध्ये 10 हजार शिक्षक काम करतात. तर बेस्टमध्ये सुमारे 36 हजार कर्मचारी काम करतात. हे सर्व कर्मचारी बोनस दिल्याने सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर खुश झाले आहेत. पालिकेचे आणि शिक्षण विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या कामाला असतात. बोनसची रक्कम वाढवून दिल्याने कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटूंबीयांची मते सत्ताधारी शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला मिळणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक सुनिल शिंदे यांनी दिली.
- पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये भरघोस वाढ -
मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये इतका बोनस देण्यात आला होता. त्याच्या मागील वर्षी 15 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा मागील वर्षापेक्षा 500 रुपये वाढवून 16 हजार रुपये बोनस देण्याची शक्यता होती. तर 22 हजार रुपये इतका बोनस द्यावा अशी मागणी कामगार संघटनांची होती. ही मागणी मान्य करत 20 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा काल करण्यात आली. पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या रक्कमेत 4500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
- बेस्ट कर्मचाऱ्यांना दुप्पट बोनस -
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये इतका बोनस देण्यात येत होता. मागील वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये इतका बोनस देण्यात आला होता. या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस देण्यात आला आहे. मागील वर्षापेक्षा बेस्ट कर्मचाऱ्यांना दुप्पट बोनस देण्यात आला आहे.
- असा दिला जाणार बोनस -
पालिका कर्मचारी - २० हजार रुपये
बेस्ट कर्मचारी - २० हजार रुपये
आरोग्य सेविका (भाऊबीज भेट) - ५३०० रुपये
माध्यमिक शिक्षक - १० हजार रुपये
अनुदानित आणि विनानुदानित शाळांमधील कर्मचारी १० हजर रुपये
कॉलेजमधील शिक्षक १० हजार रुपये
शिक्षण सेवक - २८०० रुपये
पार्ट टाइम शिक्षण सेवक - २८०० रुपये
हेही वाचा - Bonus : वीज कंपन्यांतील नियमित व सहायक कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर