मुंबई - छत्रपती संभाजी राजे ( Sambhaji Raje Contesting Rajyasabha Election ) यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. त्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांनी पाठिंबा दिल्याचे संभाजी राजे यांनी जाहीर केले आहे. महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत सावध पवित्रा घेत अद्याप काहीही ठरलेले नाही, असे म्हटले आहे. तर शिवसेना संभाजी राजेंना पक्षप्रवेश करण्याची ऑफर करत आहे. मात्र, शरद पवार यांचे राजकारण पाहता त्यांनी आजपर्यंत राजघराण्यातील उमेदवारांना सातत्याने मदत केल्याचे दिसते. सातारचे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांना शरद पवारांनी बळ दिले, तर रामराजे नाईक निंबाळकर हे दुसरे संस्थानिक गेली काही वर्ष शरद पवारांच्या पाठबळावर राजकारण करत आहेत. शरद पवार राजघराण्यातील या व्यक्तींना का मदत करत करतात, याविषयी जाणकारांनी आपली मते व्यक्त केली आहेत. निवडून येण्याची क्षमता हा त्यातील मुख्य गाभा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे, तर शरद पवारांना राजघराण्या विषयी नाही, तर राजघराण्याचा प्रभाव असलेल्या मतदारांविषयी प्रेम असल्याची प्रतिक्रिया जाणकार व्यक्त करतात.
निवडून येण्याची क्षमता हाच निकष - शरद पवार हे सातत्याने राजघराण्यातील उमेदवारांना मदत करताना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता हेच आहे, अशी प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषण पांडुरंग मस्के यांनी व्यक्त केली. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ज्या भागात अधिक प्रबळ आहे, त्याच भागात या राजघराण्यातील व्यक्तींच्या अधिक मतदार संघ आहेत. त्यामुळे शरद पवार या उमेदवारांना बळ देताना दिसतात. यामागे कोणतेही अन्य कारण असल्याचे दिसत नाही, असेही मस्के यांनी सांगितले.
शिवप्रेमी जनतेसाठी संस्थानिकांना पाठिंबा - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी सातत्याने पश्चिम महाराष्ट्रातील संस्थानिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाना नेहमीच पाठबळ दिले आहे. याचे कारण म्हणजे या छत्रपती शिवरायांच्या वंशज्यांवर राष्ट्रवादीचे प्रेम आहे असे नाही, तर महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या नावाचा करिष्मा हा कायम आहे आणि तो कायम असणार आहे. त्यामुळे आजही राजघराण्याला समाज माणसात मोठा मान आहे आणि त्याचा आदर केला जातो. शरद पवार यांनी राजघराण्यातील उमेदवारांना नेहमी पाठिंबा दिला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषता राजघराण्यांना मानणारे आणि छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आणि मतदार आहेत. मतदारांना आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षासोबत बांधून ठेवण्यासाठी राजघराण्यातील व्यक्तींना राष्ट्रवादीकडून पाठबळ दिले जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव दत्ताजीराव देसाई, यांनी व्यक्त केली आहे.