मुंबई - संजय राठोड आमचे मित्र आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना आम्हाला त्रास होतो. पण पूजा चव्हाण प्रकरण घडल्यानंतर 20 दिवस कुठलीच कारवाई का होत नाही? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. इतके थेट पुरावे असताना पोलीस काम करत नसतील तर वानवाडी पोलीस स्टेशनच्या पीआयला तत्काळ निलंबित करायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरेंनाही चिमटा
वरळीच्या आमदारांचे नाईट लाईफचे स्वप्न होते. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाईट क्लबमध्ये जाऊन तिथून फेसबुक लाईव्ह केलं. ११ वाजेनंतर बंद वगैरे नियम इतरांकरता आहेत. कमला मिलमध्ये यो क्लब, प्रिन्स बारमधून फेसबुक लाईव्ह झालं. तिथे असलेल्या लोकांनी कुणीही मास्क लावला नव्हता. तिथे कोविड होत नाही. कोविड मंदिरात आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये होतो. हे बार कुणाच्या आशीर्वादाने चालतायत? असा सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा - दुसऱ्या दिवशीही कोविन अॅपचा गोंधळ; लसीकरणासाठी अडचणी
सर्वात आधी माझं कुटुंब माझी जबाबदारी…आता मीच जबाबदार..म्हणजे सरकारची काहीच जबाबदारी नाही. सरकार हात झटकून मोकळं आहे. आपली पाठ थोपटण्यासाठी तयार आहे. बाकी सगळी जबाबदारी तुम्ही घ्या. मागच्या वेळी सुधीर मुनगंटीवार बोलले ना…सगळी जबाबदारी तुमची आणि उरलेली मोदींची. आमची काही जबाबदारीच नाही. अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यपालांचे भाषण म्हणजे पुढील एक वर्षात काय करणार आहोत, आमची दिशा काय आहे यासंदर्भात असले पाहिजे. पण त्यात काहीच पाहायला मिळत नाही. फक्त शब्दांचे रत्न लावून लोककल्याण साधता येत नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
यमक जुळवणारी भाषा यशाचं गमक असू शकत नाही हे मला राज्य सरकारला सांगायचे आहे, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. देशात झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहे. कशाबद्दल पाठ थोपटून घेत आहात? डॉक्टरचा सल्ला घेतो की कम्पाऊंडरचा हा प्रश्न मला खरोखरच या सरकारला विचारावासा वाटतो. देशाच्या ४६ टक्के सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे फडणवीस म्हणालेत. तसेच रुग्णसंख्या जी वाढत आहे की त्यामागे इतर काय आहे असे प्रश्न निर्माण होतात. अमरावतीत जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने चाचणी केंद्रावरुन रिपोर्ट कसा आहे याचा फोन आल्याचं सांगितलं होते. मग कशाच्या आधारे अमरावतीत लॉकडाउन केला? लॉकडाउन केलं त्या काळात निदान, व्यवस्था नव्हती. पण आज मनात आलं की लॉकडाऊन केलं जात आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.
हेही वाचा - कालमर्यादा संपलेल्या मशीन गळ्यात; 'कंडेक्टर मामां'वर आत्महत्या करण्याची वेळ..!
मला मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह आवडले-
कोरोना काळापासून ते आत्तापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने राज्यातील जनतेसोबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत आले आहेत. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी वारंवार टीका केली. आज देखील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्ह वरून सभागृहात चिमटा काढला. मुख्यमंत्र्यांचे २१ फेब्रुवारीचे लाइव्ह हे सर्वात्कृष्ट होते. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का विचारले…कारण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे. हेच आम्ही सांगत आहोत? या महाराष्ट्रातील जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. हेच आम्हाला सांगायचं आहे की, तो आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी टीका फडणवीसांनी केली.
कोविड काळात भ्रष्टाचार
कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने ज्याप्रकारे हाताळणी केली असती तर ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी असते, तर ३० हजार ९०० मृत्यू महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं? आम्ही सगळ्यात मोठं रुग्णालय विक्रमी वेळेत बांधल्याचं सांगण्यात आले, पण यात विक्रमी भ्रष्टाचारदेखील झाला. निविदा न मागवता गाद्या, उशा, सलाइन यांवर ६० लाख रुपये खर्च केले. १२०० रुपयांचं थर्मामीटर ६५०० रुपयांत खरेदी केली. २ लाखांच्या बेडशीटसाठी ८.५ लाख भांड दिलं. पंख्याचं ९० दिवसांचं भाडं ९ हजार दिलं. हजार प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं चार लाख रुपये. लाकडाचे १५० टेबलचं भाडं सहा लाख ७५ हजार रुपये….काय काय घोटाळे सांगायचे. जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळ्याची पुस्तिका तयार केली असून मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे. हा रेकॉर्ड वेळेतील भ्रष्टाचार आहे,” असा आरोप फडणवीसांनी केला. मृतदेहांच्या बॅग, पीपीई किटचाही घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केली. घोटाळा समोर आणला तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी या शब्दाचा अर्थ कळेल, अशी टीका त्यांनी केली.