मुंबई - महाराष्ट्रातही तौक्ते वादळ आले, मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तौक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे, मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? महाराष्ट्राबद्दल असलेल्या या भेदभावाबद्दल नवाब मलिक यांनी ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात नुकसान -
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला आहे. यामुळे कोळी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हजारो बोटी समुद्रकिनाऱ्यालगत तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर, बागायतदार शेतकऱ्यांच्या ही मोठे नुकसान झाले. या सर्व नुकसानाची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करायला हवी होती, असंही यावेळी नवाब मलिक म्हणाले आहेत.
हेही वाचा - तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल पुन्हा 21 मे पर्यंत तहकूब