मुंबई - अंबानी स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर एनआयएच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात विरोधी पक्षाने शिवसेनेला घेरण्याची जोरदार तयारी केली आहे. आज आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत युवा नेते वरूण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्या संबंधावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपामुळे वरूण सरदेसाई पुन्हा चर्चेत आले आहेत.
हेही वाचा - इनोव्हाची नंबरप्लेट बदलली? पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडताना सीसीटीव्हीत कैद
नितेश राणे यांनी वरूण सरदेसाई यांच्यावर केलेले आरोप
वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना वरुण सरदेसाईंचा फोन जात होता. वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय काय बोलणं झालं याची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरदेसाई कुणाचे नातेवाईक आहेत आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केले जात होते हे सांगण्याची गरज नाही, असे आरोप राणे यांनी वरूण सरदेसाई यांच्यावर केले आहेत.
कोण आहेत वरुण सरदेसाई?
वरुण सतीश सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेची महत्त्वाची जबाबदारी आहे. तसंच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. सरदेसाईंनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी जाहीररित्या सर्वप्रथम मागणी वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता. मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्यूहरचनेत वरुण सरदेसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सुरक्षा व्यवस्थेवरूनही झाला होता वाद
युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. या सुरक्षा व्यवस्थेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षाने देखील या निर्णयामुळे सरकारवर टीका केली होती.
हेही वाचा - आधी मुख्यमंत्र्यांची चर्चा, आता राष्ट्रवादीची बैठक, वाझे प्रकरणावर पवारांच्या भूमिकेकडे लक्ष