मुंबई - पुणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, नागपूर आदी महापालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अद्याप यात व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश कधी होणार याची माहितीच या प्रवेश प्रक्रियेदरम्यान देण्यात आली नसल्याने याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील चार दिवसांपासून सुरू झाली आहे. यात कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असलेल्या व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाच्या जागा आणि त्यासाठीचे नेमके वेळापत्रक अद्यापही जाहीर झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप 'सिस्कॉम' संस्थेच्या संचालक व शिक्षण प्रमुख वैशाली बाफना यांनी केला आहे.
अकरावी प्रवेशासाठी अनेक महाविद्यालये शुल्क आकारतात, परंतु त्याची नेमकी माहिती नसते. यामुळे प्रवेश प्रक्रियेदरमयान प्रत्येक महाविद्यालयांकडे असलेल्या प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, खेळाचे मैदान, वाचनालय, एनसीसीसारखे इतर उपक्रम, विभागाशी सलग्न असणारे कोर्सेसच्या माहितीसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाची वेबसाईट ही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी असलेल्या संकेतस्थळाला जोडून घ्यावी, यामुळे विद्यार्थी आणि पालकांना माहिती मिळेल, अशी मागणीही बाफना यांनी केली.
शालेय शिक्षण विभागाने या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरात एकच शासन निर्णय पारित करावा, आणि प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी संस्थेची निवड करण्याऐवजी शासकीय आदेशानुसार परिपूर्ण सॉफ्टवेअर तयार करून राज्यात ती एकाच सॉफ्टवेअरमधून राबवली जावी, अशी मागणीही बाफना यांनी केली आहे. तर, अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत यंदा काही बदल करण्यात आल्याने त्याचे स्वागतही बाफना यांनी केले आहे.
मागील काही वर्षात अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या लेखापरिक्षणात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रुटी असून, त्या दूर करण्यासाठी स्वतंत्र संस्थेमार्फत प्रवेश प्रक्रियेचे सर्वकष लेखापरीक्षण केले जावे, या मागण्याही त्यांनी केल्या आहेत.