मुंबई - आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेत राज्य सरकारवर अधिकाऱ्यांनी केलेले आरोप आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये असणाऱ्या रॅकेट संदर्भात तक्रार केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी शंभर कोटी अवैधरित्या जमा करण्याचा जो आरोप लावला होता. त्या शंभर कोटींमध्ये काँग्रेसचा वाटा किती, असा थेट सवाल करत काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान, याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती-
"वाटा आणि घाटा" हे देवेंद्र फडणवीस सरकार राज्यात असताना होत होतं. राज्यात भाजपचे सरकार असताना ते आरएसएसला किती वाटा देत होते? आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं. विरोधी पक्षाकडून वारंवार महाराष्ट्राची बदनामी होत असून हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष चुकीच्या मार्गाने चालला आहे, अशी टिका नाना पटोले यांनी केली. तसेच राज भवन म्हणजे भाजपचे कार्यालय झालं आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
अंबानीचा घरासमोर सापडलेले स्फोटके जिलेटीनच्या कांड्या नागपुरातून आल्या होत्या. तसेच हिरेनला कोणी मारले, याबाबत केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. मग तपास यंत्रणा हे सर्व सांगत का नाही, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाटा विचारतात-
काँग्रेसने या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाटा विचारत असतील तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झालेत. ते राज्य सरकारने उघडकीस करावं. परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपावाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती, असे पटोले म्हणाले.
भाजपकडून अधिकाऱ्यांचा वापर-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर लावलेले आरोप एक गंभीर आहेत. याची चौकशीही झाली पाहिजे. पण परमबीर सिंग हे काल-परवापर्यंत भाजपला खटकत होते. मात्र परमबीर सिंग यांनी आरोप लावल्यानंतर ते भाजपचे आवडते अधिकारी झाली आहेत, असा चिमटाही नाना पटोले यांनी यावेळी काढला. तसेच केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात भाजप अधिकाऱ्यांना हाताशी धरून कशाप्रकारे काम करते हे सर्व देशाला माहित आहे.
फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत-
फडणीस सरकारमध्ये सुद्धा मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र फडणवीस स्वत: न्यायाधीश झाले होते. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ते क्लीन चीट द्यायचे. त्यावेळी का राजीनामा घेतले नाहीत?, असा कणखर प्रश्न पटोले यांनी विचारला. दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच काँग्रेसची भूमिका आहे. परमबीर सिंह दोषी आहेत की अनिल देशमुख, हे तपासावं लागेल. फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायाधीशाची भूमिका निभावत होते. तसेच राजकारणात आरोप होत असतात पण सत्यता समोर येईपर्यंत राजीनामा घेणं चुकीचं असल्याचे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा- परमबीर सिंग यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश