मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये पश्चिम रेल्वेने ई लिलावाद्वारे 45 कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री करून भारतीय रेल्वेत सर्वाधिक भंगार विक्रीचा उच्चांक नोंदवला आहे.
लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा ठप्प असल्याने रेल्वेचे उत्पन्न बंद झाले आहे. त्यामुळे रेल्वेला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीचा निर्णय घेतला. पश्चिम रेल्वेच्या साहित्य प्रबंधक विभागातील विविध कारखान्यात, रेल्वेचे डेपो आणि रेल्वे रुळांशेजारी पडलेले भंगार व माहीम डेपोजवळील भंगार आदि एकत्र करून त्याचा ई लिलाव करण्यात आला. त्यातून पश्चिम रेल्वेला सुमारे 45 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न रेल्वेच्या सर्व झोनमधून सर्वाधिक विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांनी साहित्य विभागाचे प्रमुख मुख्य व्यवस्थापक जे पी पांडेय आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. पश्चिम रेल्वेने एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व झोनच्या कारखान्यातील भंगार आणि रेल्वे रूळ परिसरातील भंगार याची पाहणी केली. त्यानंतर जूनमध्ये त्याच्या ई लिलावाला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक विभागाद्वारे महालक्ष्मी, साबरमती, प्रताप नगर डेपो आणि मुंबई, वडोदरा, रतलाम, अहमदाबाद, राजकोट आणि भावनगर येथून महिन्यातून दोनदा ई लिलाव करण्यात आले. यात अनसर्विसेबल रेल्वे, स्लीपर, उपयोगात नसलेले लोकोमोटिव, कोच, वॅगन, रुळाचे साहित्यविविध कारखान्यातून व कारशेडमधून वापरात नसलेल्या साहित्याचा समावेश होता.