मुंबई - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जात आहे. पण ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता, पश्चिम रेल्वेकडून ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जात आहे. मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जात आहे. या प्लांटमधून दर एका मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.
- दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी -
कोरोना विरोधातील लढ्यात भारतीय रेल्वेचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. एकीकडे रेल्वे ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून देशभरातील विविध भागात ऑक्सिजन पोहचवत आहे. दुसरीकडे प्रवासी आणि मालवाहतुकीचे कर्तव्यही चोखपणे बजावत आहे. त्याचवेळी रेल्वेने आपल्या विभागाअंतर्गतच्या वैद्यकीय सुविधाही वाढवण्यावर भर दिला आहे. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी पश्चिम रेल्वेने कंबर कसली असून, मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात हे दोन प्लांट पूर्ण होणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
- 5 कोटी 60 लाख रुपयांचा खर्च -
देशात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने तत्काळ आपल्या सर्व विभागातील रेल्वे हॉस्पिटल प्रशासनाला ऑक्सिजन प्लांट सदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. तसेच प्लांट लवकरात लवकर सुरू करावे, असा आदेश सर्व झोनच्या रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहेत. त्यानुसार पश्चिम रेल्वे प्रत्येक विभागात 5.60 कोटी रुपये खर्च करून सात रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची उभारले जाणार आहेत. पश्चिम रेल्वे झोनमधील मुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोट, भावनगर, बडोदा या विभागातील रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभे करण्यात येत आहेत.
- ऑक्सिजन प्लांटची मदत होणार-
पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील जनजीवन राम रुग्णालयात 1 कोटी 12 लाखांचा खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभे केले जात आहेत. यातून मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाईल. यामुळे दरदिवशी 200 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भागवता येईल. जगजीवन राम रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजन प्लांटमधील ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल. तर, शहरात असलेल्या रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणविल्यास, रेल्वे अधिकारी इतर रुग्णांलयांना ऑक्सिजनचा पुरवठा करतील. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने ऑक्सिजन प्लांटची मदत होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - माझ्याकडे मोकळा वेळ नाही, मी भला माझी कामे भली - अजित पवार