मीरा-भाईंदर - शिवसेनेतील बंडखोरीनंतर अनेक नगरसेवक शिंदे गटात ( Shinde Group ) सामील होत आहेत. मीरा-भाईंदरच्या काही नगरसेवकांनी आमदार प्रताप सरनाईक ( MLA Pratap Sarnaik ) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाला पाठिंबा दिला. १८ नगरसेवक सोबत आल्याचा दावा मुख्यमंत्री आणि आमदार सरनाईक यांनी केला असताना मीरा-भाईंदरच्या गटनेत्या नीलम धवन ( Neelam Dhawan ) यांनी तो खोडून काढला. केवळ ९ नगरसेवक शिंदे गटासोबत गेले ( 9 corporators Support Shinde group )असून दहा नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे त्या म्हणाल्या.
मीरा भाईंदरमधील नगरसेवकांचा पाठिंबा - संपूर्ण महाराष्ट्राला राजकीय भूकंपाने हादरा देणारे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका पाठोपाठ एक स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी राजन विचारे वगळता सर्वच ठाण्यातील नगरसेवकांनी शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर पाठोपाठ मीरा भाईंदर मधील नगरसेवक फोडण्यात यश आले आहे.
10 नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन १८ नगरसेवक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन समर्थन दिल्याचे स्पष्ट केले. मात्र, मीरा भाईंदर मधील नऊ नगरसेवक ( 9 corporators from Mira Bhayander ) वगळता 10 नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Party chief Uddhav Thackeray ) यांच्या पाठीशी ठाम आहेत. सध्या पक्षप्रमुखांच्या मागे मोठा व्याप लागला असून त्यांना एकट सोडून जाणार नाही, असे गटनेत्या नीलम धवन यांनी सांगितले. तसेच पक्षप्रमुखांची भेट घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यांनी दिला शिंदे गटाला पाठिंबा - नगरसेवक राजू भोईर, कमलेश भोईर, धनेश पाटील, संध्या पाटील, वंदना पाटील, कुसुम गुप्ता, गोविंद जॉर्जि, एलियस बांड्या, अनंत शिर्के, असे एकूण सेनेचे ९ आणि एक स्विकृत नगरसेवक विक्रम प्रताप सिंग असे एकूण १० नगरसेवकांनी पाठिंबा दिला.
महापालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ - २०१७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण शिवसेनेचे २२ नगरसेवक निवडून आले. यामधील दोन नगरसेविका अनिता पाटील, दीप्ती भट्ट यांनी भाजपला समर्थन दिले आहे. तर भाईंदर पूर्वेच्या प्रभाग दहा मधील नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे सध्या स्थितीत सेनेच १९ चे संख्याबळ आहे.
एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छाचे बॅनर - मिरा भाईंदरमध्ये शिंदे मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छाचे बॅनर कटलीन परेरा यांनी शहरात लावले. मात्र शिंदे यांच्या पाठींब्या वेळी कँटलीन परेरा गैरहजर होत्या. तर शर्मिला बागजी या मीरा भाईंदर शहराच्या बाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजू भोईर जरी शिंदे गटात सामील झाले आहेत. परंतु त्यांच्या पत्नी भावना भोईर उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं बोललं जातं आहे. भावना भोईर देखील अनुउपस्थित होत्या. उर्वरित नगरसेवक प्रवीण पाटील, नीलम ढवन, अर्चना कदम, जयंतीलाल पाटील, स्नेहा पांडे, दिनेश नलावडे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.