मुंबई- मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात होणार आहेत. यामध्ये वॉटर टॅक्सीचे १२ आणि रोपॅक्स फेरी सेवेचे ४ नवे मार्ग लवकरच सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.
रोपॅक्स-फेरी सेवेचे ४ नवे मार्ग -
मुंबईनजीकच्या शहरांतून सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील ही कोंडी फोडण्यासाठी आणि पर्यावरण स्नेही म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात यावर्षी डिसेंबरमध्ये करण्याचे प्रयोजन असल्याची माहिती बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. या जलमार्ग वाहतूक प्रकल्पाची आढावा बैठक बुधवारी व्हीडियो कॉन्फरन्स पद्धतीने पार पडली. यामध्ये वॉटर टॅक्सीचे १२ आणि रोपॅक्स फेरी सेवेचे ४ नवे मार्ग लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती मांडवीय यांनी दिली.
वॉटर टॅक्सी व रोपॅक्स सेवा डिसेंबरपर्यंत होणार सुरू मुंबईकरांची वेळेची बचत- गेल्या वर्षीपासून भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) या रोपॅक्स अर्थात रो-रो सेवेमुळे रस्ते मार्गाने होणारा ११० किलोमीटरचा प्रवास जलमार्गाने १८ किलोमीटर एवढा कमी झाला आहे. त्यामुळे दररोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तीन ते चार तासांचा वेळ अवघ्या एका तासापर्यंत कमी झाला आहे. विशेष म्हणजे यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुद्धा कमी झालेले आहे. या फेरी सेवेचे प्रचंड फायदे बघता मुंबईतील विविध मार्गांवर अशाच प्रकारच्या सेवा कार्यान्वित करण्याची योजना वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवेत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
ही आहेत जलवाहतुकीचे नवे मार्ग ?
भाऊचा धक्का ते नेरूळ, भाऊचा धक्का ते काशिद, भाऊचा धक्का ते मोरा आणि भाऊचा धक्का ते रेवस असे रोपॅक्स फेरी सेवेसाठी ४ नवे मार्ग लवकरच सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे मोरा, रेवस आणि काशिदच्या नागरिकांना आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहेत.
वॉटर टॅक्सी या मार्गावर धावणार -
भाऊचा धक्का ते नेरूळ, भाऊचा धक्का ते बेलापूर, भाऊचा धक्का ते वाशी, भाऊचा धक्का ते ऐरोली भाऊचा धक्का ते रेवस, भाऊचा धक्का ते करंजा, भाऊचा धक्का ते धरमतार आणि बेलापूर ते ठाणे, बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया, वाशी ते ठाणे, वाशी ते गेट वे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का ते कान्होजी आंग्रे बेट या 12 मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार आहेत.
पर्यटनाला मिळणार चालना -
मुंबईतून ठाणे, नवी मुंबई अशा महामुंबईत रस्ते वाहतुकीद्वारे फिरताना तासन-तास वेळ खर्ची घालावा लागतो. मात्र जल वाहतुकीमुळे महामुंबईची परिक्रमा काही मिनिटांत करता येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई ते वाशी, वाशी ते ठाणे, बेलापूर ते ठाणे आणि मुंबई ते अलिबाग असा दैनंदिन प्रवास काही मिनिटांत कापता येणार आहे. त्यामुळे पर्यटनाला सुद्धा चांगला मिळणार आहे.