मुंबई - यंदा डिसेंबर महिन्यात मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतुकीस शासनाकडून जोर दिला जात आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यात वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात होणार आहे. यामध्ये वॉटर टॅक्सीचे १२ आणि रोपॅक्स फेरी सेवेचे ४ नवे मार्ग लवकरच सुरू केले जातील. यासाठी सागरी महामंडळाकडून युद्धपातळीवर जेट्टी उभारण्यात येत आहे.
जेट्टी उभारण्याचा कामे युद्धपातळीवर
मुंबईनजीकच्या शहरांतून सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील ही कोंडी फोडण्यासाठी आणि पर्यावरण स्नेही म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना सरकारकडून देण्यात आली आहे. मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात यावर्षी डिसेंबरमध्ये करण्याची घोषणा बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र पोर्ट ट्रस्ट आणि सागरी महामंडळ युद्धपातळीवर कामाला लागले आहे.
युध्दपातळीवर उभारण्यात आली आहे जेट्टी
सागरी महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जेट्टी उभारण्याचा कामात अडथळा निर्माण झालेला होता. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे युद्धपातळीवर जेट्टी उभारण्यात येत आहे. काम पूर्ण होताच वॉटर टॅक्सी सुरु करण्यासंबंधित महाराष्ट्र पोर्ट ट्रस्ट बरोबर बैठक घेण्यात येईल त्यानंतरच वॉटर टॅक्सी कारण्याबाबद निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबईकरांची वेळेची बचत
भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) या रोपॅक्स अर्थात रोरो सेवेमुळे रस्ते मार्गाने होणारा ११० किलोमीटरचा प्रवास जलमार्गाने १८ किलोमीटर एवढा कमी झाला आहे. त्यामुळे दररोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तीन ते चार तासांचा वेळ अवघ्या एका तासापर्यंत कमी झाला आहे. विशेष म्हणजे यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुद्धा कमी झालेले आहे.या फेरी सेवेचे प्रचंड फायदे बघता मुंबईतील विविध मार्गांवर अशाच प्रकारच्या सेवा कार्यान्वित करण्याची योजना वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवेत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यामध्ये वॉटर टॅक्सीचे १२ आणि रोपॅक्स फेरी सेवेचे ४ नवे मार्ग लवकरच सुरू केले जातील.
वॉटर टॅक्सी या मार्गावर धावणार
भाऊचा धक्का ते नेरूळ, भाऊचा धक्का ते बेलापूर , भाऊचा धक्का ते वाशी, भाऊचा धक्का ते ऐरोली भाऊचा धक्का ते रेवस, भाऊचा धक्का ते करंजा,भाऊचा धक्का ते धरमतार आणि बेलापूर ते ठाणे,बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वाशी ते ठाणे, वाशी ते गेट वे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का ते कान्होजी आंग्रे बेट या 12 मार्गावर वॉटर टॅक्सी धावरणार आहेत.
पर्यटनाला मिळणार चालना
मुंबईतून ठाणे, नवी मुंबई अशा महामुंबईत रस्ते वाहतुकीद्वारे फिरताना तासन-तास वेळ खर्ची घालावा लागतो. मात्र जल वाहतुकीमुळे महामुंबईची परिक्रमा काही मिनिटांत करता येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई ते वाशी, वाशी ते ठाणे, बेलापूर ते ठाणे आणि मुंबई ते अलिबाग असा दैनंदिन प्रवास काही मिनिटांत कापता येणार आहे. त्यामुळे पर्यटनाला सुद्धा चांगला मिळणार आहे.
जलमार्गाचे अंतर रस्ते वाहतुकीमधील अंतर
1) भाऊचा धक्का ते नेरूळ अंतर जलमार्ग १९ किलोमीटर तर रस्ते मार्ग ३४ किलोमीटर असून लागणार वेळ हा जलमार्गाने ४० मिनिट आणि रस्तेमार्गाने १ तास १५ मिनिट लागणार आहे.
2)भाऊचा धक्का ते बेलापूर अंतर जलमार्ग २० किलोमीटर तर रस्ते मार्ग ४० किलोमीटर असून लागणार वेळ हा जलमार्गाने ४५ मिनिट आणि रस्तेमार्गाने १ तास लागणार आहे.
3) भाऊचा धक्का ते वाशी अंतर जलमार्ग २३ किलोमीटर तर रस्ते मार्ग २८ किलोमीटर असून लागणारा वेळ हा जलमार्गाने ४० मिनिट आणि रस्तेमार्गाने ४६ मिनिट लागणार आहे.
4) भाऊचा धक्का ते रेवस अंतर जलमार्ग १८ किलोमीटर तर रस्ते मार्ग ११० किलोमीटर असून लागणारा वेळ हा जलमार्गाने १ तास १५ मिनिट आणि रस्तेमार्गाने २ तास ४५ मिनिटे लागणार आहे.
5) भाऊचा धक्का ते करंजा अंतर जलमार्ग १८ किलोमीटर तर रस्ते मार्ग ७० किलोमीटर असून लागणारा वेळ हा जल मार्गाने १ तास १५ मिनिट आणि रस्ते मार्गाने २ तास लागणार आहे.
6) भाऊचा धक्का ते धरमतार अंतर जलमार्ग ४० किलोमीटर तर रस्ते मार्ग ८३ किलोमीटर असून लागणारा वेळ हा जल मार्गाने १ तास ३० मिनिट आणि रस्ते मार्गाने २ तास १५ मिनिटे लागणार आहे.
7) बेलापूर ते ठाणे अंतर जलमार्ग २५ किलोमीटर तर रस्ते मार्ग २५ किलोमीटर असून लागणारा वेळ हा जल मार्गाने २० मिनिट आणि रस्ते मार्गाने १ तास लागणार आहे.
8) बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया अंतर जलमार्ग २३ किलोमीटर तर रस्ते मार्ग ३८ किलोमीटर असून लागणारा वेळ हा जल मार्गाने २० मिनिट आणि रस्ते मार्गाने १ तास २० मिनिटे लागणार आहे.
9) वाशी ते ठाणे अंतर जलमार्ग १२ किलोमीटर तर रस्ते मार्गाने २० किलोमीटर असून लागणार वेळ हा जल मार्गाने १५ मिनिटे आणि रस्ते मार्गाने ४५ मिनिटे लागणार आहे.
10) वाशी ते गेट वे ऑफ इंडिया अंतर जलमार्ग २५ किलोमीटर तर रस्ते मार्गाने २८ किलोमीटर असून लागणारा वेळ हा जल मार्गाने २० मिनिटे आणि रस्ते मार्गाने १ तास १५ मिनिटे लागणार आहे.
हेही वाचा - बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावालाचा मृत्यू; 'या' प्रकरणात मुबंई पोलिसांनी केली होती अटक