मुंबई : मागील आठवड्यात मुंबईत मुसळधार पाऊस पडला. या पावसादरम्यान मुंबई शहरतील हँगिंग गार्डनजवळ एन. एस. पाटकर मार्गालगत भूस्खलनामुळे जलवाहिनी फुटली होती. चार दिवसानंतर या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून या विभागातील पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या हद्दीत, बी. जी. खेर मार्गाची एन. एस. पाटकर मार्गालगत असलेली संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे ५ ऑगस्टच्या रात्री खचली, तसेच तेथील काही वृक्षदेखील उन्मळून पडली. या भूस्खलनामुळे येथील ४ जलवाहिन्या बाधित झाल्या होत्या. पालिका आयुक्तांनी या घटनस्थळाला भेट देताना पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आदेश दिले होते. संरक्षक भिंत खचल्याने त्याठिकाणाहून जाणाऱ्या ४ जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात क्षती पोहोचली होती. यामुळे एन. एस. पाटकर मार्ग, ए. के. मार्ग, पेडर रोड, सोफिया लेन, कार्माईकेल मार्ग, राघोजी मार्ग, फॉर्जेट हिल व रोड, अल्टामाऊंट रोड आदी भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. दरम्यान बाधित भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पर्यायी जलवाहिनी जोडून संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम रविवारी रात्री पूर्ण झाले असून सोमवार सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.