मुंबई : मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलं आहे. बळजबरीच्या जोरावर मराठा आरक्षण मागणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने ही एक चपराक दिली आहे असं मत ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केलं आहे.
ही धनशक्तीला चपराक
मराठा आरक्षणाच्या विरोधात ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली होती. त्यांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निकाल देताना मराठा आरक्षण रद्द ठरविले. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देताना या निर्णयाचे स्वागत केले. हा सामाजिक विजय आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय जसा रद्द झाला आहे तसेच भारतातील सगळे आरक्षण हे रद्द झाले पाहिजे. धनशक्तीच्या जोरावर ज्यांनी 52 मोर्चे काढले त्यांना ही एक चपराक आहे असे सदावर्ते यावेळी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण ठरविले घटनाबाह्य
आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाबाबत अंतिम सुनावणी झाली. त्यात राज्य सरकारने दिलेल मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, न्यायमूर्ती एस अब्दुल नाझीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिलेला आहे.