मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये सुरू असलेली शाब्दिक लढाई पुढे जाऊन कायदेशीर लढाई देखील होऊ शकते. मात्र तसे झाल्यास नारायण राणे हे अधिक अडचणीत येऊ शकतात, असे मतं राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी नाशिक, रायगड आणि पुण्यामध्ये राणे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या. या तक्रारीनंतर नारायण राणे यांना अटक करून महाड येथील दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या सुनावणीत नारायण राणे यांना जामीनही मंजूर झाला. मात्र या अटक सत्रानंतर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात असलेल्या वादाला नव्याने सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर सुरू झालेल्या जनआशीर्वद यात्रेत नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री यांच्यावर नाव न घेता शरसंधान साधने सुरूच ठेवले. यावेळी जनतेसोबत संवाद साधत असताना नारायण राणे यांनी जुन्या काही गुन्ह्यांची आठवण करून देत, "आपल्या वहिनी वर ॲसिड हल्ला कोणी केला? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणे माहीत आहेत." असं म्हणत शिवसेनेबाबतची जुनी उणीधुणी काढली जातील, असा इशारा राणेंकडून देण्यात आला आहे.
आम्हीही संदुक उघडू शकतो, संजय राऊतांचा राणेंना इशारा-
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील नारायण राणे यांना आपल्या शैलीमध्ये इशारा दिला आहे. संजय राऊत हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना, "आम्ही सभ्यपणा पाळत आहोत, कुंडल्या आमच्याकडे देखील आहेत. आम्हीही संदूक उघडू शकतो" असं म्हणत नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिला आहे. नारायण राणे यांचे मनस्वास्थ्य ठिक नाही. त्यांचे मनस्वास्थ ठिक व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करू, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला. तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनी देखील अंकुश राणे या सख्ख्या चुलत भावाचा खून कोणी केला? चिंटू शेख याला त्याच्या कार्यालयात जाऊन गोळ्या कोणी घातल्या? असं म्हणत नारायण राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
जुने गुन्हे बाहेर आल्याने राणेंच्या अडचणीत होऊ शकते वाढ-
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक लढाई सुरू झाली आहे. मात्र ही लढाई होत असतानाच दोन्ही पक्षाकडून जुन्या काही गुन्ह्यांचा उल्लेख केला जातोय. मात्र ते गुन्हे जर पुन्हा तपासासाठी बाहेर काढण्यात आले तर, त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे जास्त अडचणीत येऊ शकतील, असे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे. नारायण राणे यांच्यावर असलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतील. तसेच नारायण राणे हेदेखील काही गुन्ह्यासंदर्भात शिवसेनेचे नेते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतील, असेही मत अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि सध्याचे राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2016 मध्ये सभागृहात नारायण राणे यांच्यावर असलेल्या अनेक गुन्ह्यांची कलमा सकट यादी वाचून दाखवली होती. त्यामुळे या सर्व गुन्ह्यांमध्ये देखील नारायण राणे यांची चौकशी व्हावी, अशी देखील मागणी केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही विश्लेषकांनीकडून सांगण्यात येते आहे. त्यामुळे नारायण राणे आणि शिवसेनेची शाब्दीक लढाई कायदेशीर लढाई होऊ शकते आणि ती लढाई दोन्ही बाजुच्या नेत्यांना अडचणीत आणणारी आहे.