मुंबई - दक्षिण मुंबईतील एका तरुणाला रात्रीच्या वेळेत फिरत असल्याने मुंबई पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर गिरगाव दंडाधिकारी न्यायालय निर्णय देत म्हटले आहे की, मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणं हा गुन्हा नाही. तसेच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आज या संदर्भातील सविस्तर निकाल वेबसाईटवर प्राप्त झाला आहे.
रात्रंदिवस धावपळ - मुंबई मोठ्या शहरांत रात्रंदिवस धावपळ सुरूच असते असं म्हणतात. इथे रात्रीच्या कोणत्याही वेळी लोक रस्त्यावर दिसतात. मात्र अनेक वेळा रात्री उशिरा फिरणाऱ्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावं लागतं. अशाच एका प्रकरणात मुंबईच्या स्थानिक न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. रात्री उशिरा फिरणं आणि चेहरा लपवणं याबद्दलच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. तसंच न्यायालयाने आपल्या निर्णयात नोंदवलेली निरीक्षणंही अत्यंत महत्त्वाची आहेत. मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणं हा गुन्हा नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे.
मुंबईत रात्री दीड फार उशीर नाही - हा आदेश देताना न्यायदंडाधिकारी नदीम पटेल म्हणाले आरोपीला रात्री दीडच्या सुमारास अटक करण्यात आली. मुंबईसारख्या शहरात रात्री दीडची वेळ म्हणजे फार जास्त उशीर नसतो. यावेळी रस्त्यावर कोणीही उभा राहू शकतं. त्यामुळे गुन्हा करण्यासाठी चेहरा लपवण्यात आला होता, असं मानता येणार नाही. हा कोरोनाचा काळ आहे आणि लोक सुरक्षिततेसाठी मास्क घालतात. अनेकदा जवळ मास नसल्यास लोक रूमाल बांधतात. त्यामुळे जर आरोपीने रुमाल चेहऱ्यावर बांधला असेल तर त्याचा अर्थ त्याने आपली ओळख लपवली असा होत नाही. कोर्टात आरोप सिद्ध करण्यासाठी पोलीस कोणतेही ठोस कारण देऊ शकले नाहीत त्यानंतर कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
काय आहे प्रकरण - पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय सुमित कश्यप दक्षिण मुंबईतील परिसरामध्ये रात्री उभा असल्याने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 13 जून रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सुमित रस्त्यावर बसला होता आणि त्याने रुमालाने तोंड झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 122 B अंतर्गत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकार्यांच्या न्यायालयात पोहोचलं असता न्यायालयाने 16 जून रोजी निकाल देताना आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.
हेही वाचा - Mass Suicide Cases in India: सांगलीतील सामूहिक आत्महत्येने खळबळ; वाचा, देशभरात कुठे घडलेत असे प्रकरणं