मुंबई - सरकारने विविध ठिकाणची सार्वजनिक ठिकाणे, वाहतूक सेवा, आठवडी बाजार आदी सुरू करण्यास परवानगी दिली परंतु कोट्यवधी हिंदूंची मंदिरे मात्र खुली करण्यासाठी सरकार निर्णय घेत नाही. यामुळे हिंदूंच्या भावना प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखावल्या असून सरकारने यावर निर्णय घेतला नाही तर यापुढे आम्ही अधिक तीव्र आंदोलन छेडू आणि त्यातून होणाऱ्या परिणामाला सरकारने सामोरे जावे, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने आज दिला आहे.
राज्यभरात आज विश्व हिंदू परिषदेने मंदिरासमोर घंटानाद आणि आरती करून आंदोलन छेडले. मुंबईत असलेल्या मुंबादेवी, सिद्धिविनायक या प्रमुख मंदिरासोबतच तब्बल 30 मंदिरांसमोर आरती आणि घंटानाद करून आंदोलन छेडण्यात आले. सरकारने आमच्या हिंदूंची मंदिरे तात्काळ खुली करावीत यासाठीची मागणी करण्यात आली. विश्व हिंदू परिषद एकडून मंदिरे उघडे करा या मागणीसाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनात मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदसह इतर हिंदू संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. या वेळी हातात फलक धरून कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देण्यात आल्या.
मुंबादेवी मंदिर समोर झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर यांनी केले होते. मंदिरे बंद असल्याने यावर अवलंबून असलेल्या असंख्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून सरकार त्यासाठी काही कळत नाही, असा आरोप यावेळी त्यांनी केला. इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनात परिषदेचे मुंबई शहराचे विभाग मंत्री प्रसाद संसारे, सह मंत्री राजीव चौबे, बजरंग दल जिल्हा संयोजक मदन रेडीस, माधव बर्वे आदी सहभागी झाले होते.