मुंबई - राणीबाग म्हणजे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. कोरोनाच्या प्रसारामुळे लॉकडाऊन लावण्याल्याने राणीबाग बंद ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे बच्चे कंपनी घरात आहे. त्यांना राणीबागेत जाणे शक्य नसल्याने व्हर्चुअल टूरच्या माध्यमातून सफर घडवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात महापौरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या व्हर्च्युअल टूर (ऑनलाईन) लहान मुलांना व नागरिकांना आनंद देणारी आहे. कोरोनाच्या या काळात लहान मुलांनी याचा आनंद जरूर घ्यावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
महापौरांच्या हस्ते शुभारंभ -
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या ‘व्हर्च्युअल टूर’ निवडक दृश्य ऑनलाईन प्रक्षेपणाचा शुभारंभ शनिवारी भायखळा येथे महापौरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या. यावेळी उप महापौर अँड. सुहास वाडकर, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, ऑनलाइन व्याख्याता डॉ. सुनाली खन्ना तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला महापौर व उपमहापौर यांच्या हस्ते प्राणिसंग्रहालयात दुर्मिळ अशा कृष्णवड प्रजातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी महापौर म्हणाल्या की, भारतात कुरुक्षेत्रानंतर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात एकमेव दुर्मिळ कृष्णवडाचे झाड आहे. त्यानंतर आता या दुसऱ्या कृष्णवड वृक्षाचे रोपण करण्यात आले. ‘व्हर्च्युअल टूर’च्या निवडक दृश्यांमध्ये पशुपक्षांच्या बारीक हालचाली, डोळ्यांच्या हालचाली तसेच भाव टिपण्यात आले आहे. मुंबईच्या नागरिकांना आता हा अनुभव अनुभवता येणार आहे. तसेच जतन केलेली दुर्मिळ माहिती सुद्धा उपलब्ध होणार आहे, याबद्दल प्राणिसंग्रहालयाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करीत असल्याचे महापौरांनी सांगितले.
सोशल मीडियावर व्हर्च्युअल टूर -
'प्राणिसंग्रहालयाच्या व्हर्च्युअल टूर’च्या माध्यमातून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील वन्यप्राणी, पक्षी, तसेच परिसरातील झाडे आणि इतर जैवविविधता ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दर्शकांकरीता ऑनलाईन दाखविण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वन्यप्राणी व पक्षी , कीटक, फुलपाखरे, झाडे, पर्यावरण याबद्दल लोकांना माहिती देणे हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे महापौर म्हणाल्या. @themumbaizoo या नावाने असलेल्या फेसबुक, ट्विटर, यू - ट्यूब, इंस्टाग्रामवर ‘प्राणिसंग्रहालयाच्या व्हर्च्युअल टूर’ची ध्वनिचित्रफीत सर्वाना पाहता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. या ऑनलाईन प्रक्षेपण कार्यक्रमात डॉ. सुनाली खन्ना यांचे पर्यावरणाशी असलेल्या मानवी नात्याचा सामूहिक स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो, या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.
हेही वाचा - ठाकरे सरकाने तौक्तेग्रस्तांना केलेली मदत म्हणजे 'खोदा पहाड और निकला चुहा' - आमदार राणे