मुंबई : राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत ( Health Minister Tanaji Sawant ) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. मराठ्यांना आरक्षणाची खाज सुटली आहे अस वक्तव्य तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात केलं होत. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही राज्य सरकारला इशारा दिला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना समज द्यावा. अन्यथा त्यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्यभर गंभीर परिणाम होतील असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे.
मराठा समाजाला हव टिकणारा आरक्षण : राज्यात कोणतेही सरकार असो, मराठा समाजाने नेहमीच आरक्षणाची मागणी केली आहे. कायद्याच्या चौकटीत टिकाऊ आरक्षण मिळालं पाहिजे. याबाबत मराठा समाज नेहमीच आग्रही राहिला. त्यात काहीजणांनी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी ही मागणी केली होती. या मागे केवळ मराठा समाजाला टिकणारा आरक्षण हव आहे. मात्र कधीही मराठा समाजाने एससी किंवा एसटी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी केली नाही. भविष्यातही तशी मागणी होणार नाही. मात्र आरोग्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत केलेल्या वक्तव्य गंभीर असून आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मराठा समाज बदनाम होतोय. त्यामुळे या प्रकरणात तात्काळ मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी विनंती याचिका करते विनोद पाटील यांनी केली आहे.
काय आहे तानाजी सावंत यांचे वक्तव्य : एका कार्यक्रमादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, आता मराठा समाजाकडून ओबीसी आणि एस सी मधून आरक्षण मिळावा अशी मागणी केली जात आहे. याच्यामागे करता करविता कोण आहे हे समजणे गरजेचे आहे. दोन वेळा आरक्षण गेल्यानंतर ही मराठा समाज गप्प राहिलो मात्र आता नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची खाज सुटली असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध मराठा समाजासहित इतर स्तरातूनही केला जातोय.