मुंबई - ढाकुमाकुम ढाकुमाकूमचा जयघोष सुरू होण्यापूर्वीच विजेता सिनेमाच्या टीमने तो आनंद आधीच लुटला आहे. सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने मुंबईतील व्हीसीलिंगवूडस इंटरनॅशनलच्या आवारात दहीहंडीचे थर रचून त्यानी चक्क हंडी फोडली.
पुढचा प्रश्न होता की ही हंडी फोडणार कोण? सिनेमात कोचची भूमिका करणाऱ्या सुबोध भावेने हा प्रश्न सोडवला आणि अभिनेत्री पूजा सावंत हिला सगळ्यात वरच्या थरावर चढून ही हंडी फोडायला सागितले, तर बाकीचे सगळे कलाकार तिला मदत करण्यासाठी आणि थर रचण्यासाठी सज्ज झाले. काही कलाकार तिला चिअर अप करण्यासाठी पुढे सरसावले. पूजाने 2 थर रचून पहिल्याच प्रयत्नात ही हंडी फोडली. त्यानंतर सगळ्या कलाकारांनी मिळून मनसोक्त नाचही केला. सुबोधने पहिल्याच प्रयत्नात हंडी फोडणाऱ्या पूजाला 101 रुपये आणि मानाचा नारळ देऊन तिचा सत्कारही केला.
एकूणच काय शुटींगच्या धकाधकीतुन वेळ काढून कलाकारांनी सणाचा आनंदही द्विगुणित केला आणि आपल्या चाहत्यांना दहीहंडी जपून खेळण्याच्या शुभेच्छा देखील दिल्या. या निमित्ताने का होईना एरव्ही शांत असलेला व्हीसीलिंगवूडचा परिसर गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात भारावून गेला.